कर्मकांड, अंधश्रद्धेवर, बोलू नका हो…

अंकुश शिंगाडे 

मो: ९३७३३५९४५०

कर्मकांड अंधश्रद्धेवर कोणीच बोलू नका हो. तो आमचा प्रश्न आहे. हे आमचे भ्रामक विचार. परंतू आज विज्ञानयुग आहे. या काळात चंद्र सुर्याला देव मानण्याचा काळ नाही. कारण आज संशोधन झालंय व संशोधनानुसार सिद्ध झालंय की चंद्र, सूर्य देव नाहीत तर चंद्रावर दगड आहेत आणि सुर्यावर आग. तरीही आज काही काही महाभाग त्यांना देव मानत असतात. त्यामुळंच वाद होतात व वाद एवढे विकोपाला पोहोचतात की त्यातून भांडणं होतात. मग त्यातूनच एकमेकांचे खुन, बलात्कार आणि सारंच काही घडतं.

             कर्मकांड, अंधश्रद्धा, देवधर्म ह्या युगानयुगे चालत आलेल्या गोष्टी. या गोष्टी माणसाला माणूसकीच्या पलीकडे नेत असतात. त्यानुसार जो वागतो, ज्याला लाभ होतात. त्याला कोणी दैवी महापुरुष सुद्धा म्हणत असतात. 

           कर्मकांड, अंधश्रद्धा किंवा देवधर्म ह्या गोष्टी केवळ आजच्याच नाही तर त्या गोष्टी पुरातन काळापासून अस्तित्वात असून ज्यांना त्या गोष्टी पटल्या नाहीत, त्या लोकांनी आपआपली चूल वेगळी मांडली. त्या चूलीलाच धर्म अशी संज्ञा दिली गेली. कोणी म्हणतात की धर्माच्या या कल्पनेत हिंदू धर्म प्रथम आला तर कोणी म्हणतात की धर्माच्या या संज्ञेत हिंदू धर्म अस्तित्वातच नव्हता. 

          हिंदू धर्म………मुळातच ह्या हिंदू धर्माला पुरातन काळात वैदिक धर्म असेही म्हणतात किंवा सनातन धर्म असंही म्हटलं जातं. सनातन धर्माबाबत सांगायचं झाल्यास अलीकडे एका व्यक्तीनं सनातन धर्म की जय असा नारा दिला. त्यावरुन वादळ उठलं. कोणी म्हटलं की सनातन धर्म की जय म्हणत असल्यानं पुरातन मनू संस्कृती पुन्हा लागू होईल. परंतू असं कधीच होणार नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकच काळानुसार लोकांनी येथील सनातन धर्म टिकविण्यासाठी सनातन धर्म की जय म्हटलेलं आहे व प्रत्येकचवेळी काही व्यक्ती विरोधात गेलेले आहेत. त्यात ते सनातन धर्माच्या विरोधात गेले नाहीत. तर त्या त्या काळात त्या त्या विपरीत परिस्थितींच्या विरोधात गेले. ज्या ज्या गोष्टी त्यांना पटलेल्या नव्हत्या. त्यामुळंच आजही कोण काय म्हणतं यावर विचार करण्याची गरज नाही. याबाबत उदाहरण द्यायचं झाल्यास तथागत गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, गुरु गोविंद सिंग व प्रभू येशू ख्रिस्त तसंच मोहम्मद पैगंबरांचं देता येईल. तसंच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, महात्मा फुले, वीर सावरकर, राजा राम मोहन रॉय आणि इतर असंख्य महापुरुषांचं देता येईल. तसंच संत ज्ञानेश्वर, संत रविदास वा इतर अनेक संतांचंही देता येईल. 

           तथागत भगवान गौतम बुद्धाचं उदाहरण देतांना नेमकी गोष्ट प्रकर्षाने जाणवते की जेव्हा तथागत गौतम बुद्ध वनविहारासाठी राजवाड्याच्या बाहेर पडले. तेव्हा त्यांनी एक वयोवृद्ध, एक प्रेत व एक जराजर्जर आजारी व्यक्ती पाहिला. ते पाहून त्यांना वाईट वाटलं. दुःख झालं व ते दुःख कुणाला होवू नये म्हणून त्यांनी त्यावर मार्ग शोधण्यासाठी घरादाराचा व संसाराचा त्याग केला. त्यात त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली तपश्चर्या करुन ज्ञान प्राप्त केले. ते ज्ञान म्हणजेच बुद्ध ज्ञान होय व त्यानंतर त्यांचं ज्ञान वृद्धिंगत होत जावून त्यातून बौद्ध धम्म स्थापन झाला. हे बुद्धज्ञान तत्कालीन त्यांनी पाहिलेल्या दुःखापेक्षा वेगळंच होतं. तेच घडलं वर्धमान महावीरांबद्दल. त्यांनाही ज्या गोष्टी पटल्या नाहीत, त्या गोष्टीवर अव्हेरुन दुसरा धर्म त्यांनी स्थापन केला. अशाच प्रकारच्या गोष्टी इतर धर्म स्थापन करतांना इतर धर्माच्या संस्थापकांनी केल्या. 

          कर्मकांड, जातीयता व जातीजातीत भेदभाव, माणसाला माणसासारखी वागणूक न मिळत असलेली पाहून न आवडलेल्या डॉ. बाबासाहेबांनी पुढे जावून त्याच विपरीत परिस्थितीविरुद्ध लढा दिला व समाजातील अस्पृश्यता निश्चितच दूर केली. त्याच गोष्टी इतरही महापुरुषांनीही केल्या. संतांनीही केल्या. जे त्यांना पटले नाही. ते त्यांनी स्वतः तर त्यागले. व्यतिरीक्त त्यागायला लावले. यालाच पुढे जावून समाजसुधारणा म्हटल्या गेली. 

         आज ज्यांना वाटते की अशी समाजसुधारणा होवू नये. झालेला बदल स्विकारावासा वाटत नाही. तशाच मनोवृत्तीची मंडळी जुन्या गोष्टीचा अट्टाहास करतात. कर्मकांड, अंधश्रद्धा, भुतप्रेत व देवधर्म याबाबतीत आजच नाही तर पुरातन काळापासून महापुरुष, तत्वज्ञ तत्वज्ञान मांडत आले आहेत. चांगलं व अद्ययावत असलेलं तत्वज्ञान. तरीही शंभर प्रतिशत समाज सुधारणा झाली का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. त्यातही ब-याच लोकांना त्या अंधश्रद्धा पटल्या नाहीत, म्हणून नवीन तत्वज्ञान प्रतिपादन केलं.

          महत्वाचं म्हणजेच असे कर्मकांड, देवधर्म, भुतप्रेत व अंधश्रद्धा दूर करता याव्यात म्हणून ब-याच लोकांनी सुधारणावादी संघर्ष केला. परंतू असा सुधारणावादी संघर्ष त्या महापुरुषांच्या हस्ते झाला असला तरी शंभर प्रतिशत सुधारणा न झाल्यामुळेच आजही असे कर्मकांड, देवधर्म, अंधश्रद्धा व भुतप्रेत समाजात सुरु आहेत. काही लोकांनी आपआपल्या विचारानुसार ज्यांनी ज्यांनी त्यांचं ऐकलं, त्याच अनुयायांना घेवून वेगळा पक्ष काढला. त्याला धर्माचं नाव दिलं. काहींनी जे तत्वज्ञान मांडलं. त्याला वेगळंच नाव दिलं.

          अलीकडे कर्मकांड, देवधर्म, भुतप्रेत व अंधश्रद्धा या गोष्टी थोतांड गोष्टी वाटतात. कारण अलीकडील काळात ज्या चंद्र, सुर्याला देव मानत होतो आपण. त्याचा शोध लागला आहे व ते देव नसून केवळ तिथं मातीचे ढिगारे व आगीचे गोळे आहेत हे सिद्ध झाले आहे. विज्ञानानं एवढे शोध लावले आहेत की आज माणसाला कर्मकांड अंधश्रद्धा, भुतप्रेत व देवधर्माचा प्रकार नेमका काय आहे? हे लोकांना माहीत झाले आहे. त्यामुळं आज पाहिजे त्या प्रमाणात अंधश्रद्धा राहिलेल्या नाहीत. देवधर्मही नेमकं काय ते ओळखता येतं. तसच भुतप्रेत आज भूतलावर नसून त्यावरही कोणी विश्वास ठेवावा असं पदचिन्हं दिसत नाहीत. कर्मकांडापासून काही माणसं कोसो दूर आहेत. परंतू हे जरी खरं असलं तरी आजही काही माणसं अंधश्रद्धा पाळतात, देवधर्म मानतात, भुतप्रेतही मानतात आणि कर्मकांडही. तसेच त्यातच नेहमी गुरफटून राहतात. 

          महत्वाचं म्हणजेच या कर्मकांड, देवधर्म, अंधश्रद्धा आणि भुतप्रेत ह्या गोष्टी कितीही समाजसुधारणा झाल्यात तरी दूर होणा-या गोष्टी नाहीत. यातून काही लोकं सुधारतील. जेणेकरुन जे सुधारतील, ते वेगळंच करतील अर्थात वेगळा धर्म स्थापन करतील. बौद्ध, जैन, शिख तसेच कोणी कोणी संप्रदाय स्थापन करतील. वारकरी, सुफी, नाथ असे गरजेनुसार. परंतू कोणीही शंभर प्रतिशत समाजसुधारणा करु शकणार नाहीत. म्हणून जर कोणी आज सनातन धर्म की जय असा सूर जर काढला वा देवधर्म, अंधश्रद्धा, कर्मकांड वा भुतप्रेत आहेत असं मानलं तर त्यात कोणाला वावगं असू नये. कोणी वावगं ठरवू नये. ते म्हणणारच आणि जर कोणी कर्मकांड, अंधश्रद्धा, देवधर्म, भुतप्रेत जगात नाहीत असंही म्हटलं तरीही कोणी आक्षेप घेवू नयेत. कारण विचार तेवढ्याच प्रवृत्ती. आपण लोकांची मनं दाबू शकत नाही. लोकांना गुलामही बनवू शकत नाही. तसंच लोकांची तोंडही बंद करु शकत नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. बोलण्याचा अधिकार आहे. बोलण्यावर कुणी बंधन घालू शकत नाहीत. त्यामुळं ते लोकं काय करतात हे पाहू नये तर त्याकडं दुर्लक्ष करावं व आपली दिशा ठरवावी. तसंच उगाचंच कोणाला चीड येईल असं पाऊलही कोणत्याही धर्मानं घेवू नये. हे तेवढंच सत्य आहे. मग ते कोणतेही धर्म का असेना. त्यांनी एकमेकांच्या विचारशक्तीचा आदर करावा व परस्परांशी बंधुत्वानं वागावं म्हणजे झालं. त्यानंच प्रेम वाढीस लागेल. जे प्रेम देशहिताच्या लायक असेल यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here