लातुरमध्ये 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, तलावात उडी घेत पीडितेची आत्महत्या. 

लातुर :- लातूरमध्ये महिला अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाला आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे अपमान सहन न झाल्याने पीडित महिलेने तलावात उडी घेत आत्महत्या केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातुर जिल्ह्यातल्या अहमदपूर येथील ही घटना आहे. किशन उगाडे असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोपीने पीडित महिलेला विश्वासात घेऊन वाकी नदीच्या जवळच्या शेतामध्ये नेलं आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर पीडित महिलेच्या सुनेनं दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. पण या सगळ्यात आपला अपमान झाल्या या भावनेनं पीडितेने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. पीडितेने तलावात उडी घेत आपलं आयुष्य संपवलं. खरंतर, वयाच्या 60 व्या वर्षी अशा वेदना सोसाव्या लागल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस आरोपीची चौकशी करत असून नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडित महिलेच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here