कोकणात भाजपच्या महत्त्वाकांक्षा शिंदे गटासाठी अडचणीच्या

80
कोकणात भाजपच्या महत्त्वाकांक्षा शिंदे गटासाठी अडचणीच्या

कोकणात भाजपच्या महत्त्वाकांक्षा शिंदे गटासाठी अडचणीच्या

कोकणात संघटनात्मक बांधणीस सुरुवात

कोकणात भाजपच्या महत्त्वाकांक्षा शिंदे गटासाठी अडचणीच्या

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: कोकणात आधी संघटनात्मक बांधणी केल्यानंतर आता, भाजपने विस्ताराला सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यात धैर्यशील पाटील यांची राज्यसभेवर वर्णी लावल्यानंतर, आता विक्रांत पाटील यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील शिवसेना शिंदे गटाच्या मतदारसंघावर पक्षाने दावेदारी करण्यास सुरुवात केली आहे. कोकणात भाजपच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा शिवसेना शिंदे गटासाठी अडचणीच्या ठरण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात भाजपची ताकद मर्यादित होती. मात्र गेल्या पाच वर्षांत पक्षाने नेटाने प्रयत्न करून कोकणात विस्तार केला. विविध पक्षांतील नेत्यांना संघटनेत घेऊन भाजपने संघटनात्मक बांधणी केली. आता कार्यकर्त्यांना सत्तेतील पदे देऊन कोकणात वर्चस्व वाढवण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. या धोरणामुळे शिवसेना शिंदे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेना शिंदेगटाकडून ताब्यात घेतला. नारायण राणे यांना निवडून आणत तळकोकणात बळ वाढविले. उत्तर कोकणातील रायगड लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरेंसाठी हा मतदारसंघ शेवटच्या क्षणी सोडावा लागला.

त्यामुळे धैर्यशील पाटील यांना एक पाऊल मागे यावे लागले होते. मात्र भाजपने धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर पाठवून पुनर्वसन केले. पनवेलच्या विक्रांत पाटील यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून वर्णी लावण्यात आली आहे.

भाजपकडून तयारी
अलिबागमधून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विधानसभा लढविण्यासाठी आग्रही आहेत, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांची अडचण झाली आहे. रत्नागिरीत बाळ माने यांनी उद्याोगमंत्री उदय सामंत यांची कोंडी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना भाजपच्या राजन तेली यांच्याकडून आव्हान दिले जात आहे. कुडाळ मतदारसंघातून नीलेश राणे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सरू केली आहे. दापोली मतदारसंघातून योगेश कदम यांच्या ऐवजी दुसरा उमेदवार द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून शिवसेना शिंदेगटातील प्रस्थापित नेत्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसून येत आहे.