महाराष्ट्रदिनी सम्राटभाई संगारे ह्यांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार 

170

महाराष्ट्रदिनी सम्राटभाई संगारे ह्यांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार

मुंबई: काल महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी ह्यांच्या वांद्रे येथील कार्यालयात महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात असामान्य कर्तृत्व असलेल्या निवडक सुरक्षा रक्षकांचा सन्मान करण्यात आला त्यात आंबेडकरी चळवळीतील शहिद नेते भाई संगारे ह्यांचे वैचारिक वारसदार, मुक्त पत्रकार संघाचे संचालक, दलित पँथर मुंबई प्रदेश अध्यक्ष सम्राटभाई संगारे ह्यांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक १२ मार्च,२०२४ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास इंडियन ऑयल मुख्य कार्यालय परीसरात असलेल्या गोडाऊन मध्ये एक भला मोठा साप असल्याची बातमी सर्वत्र पसरली. सदर सापाला घाबरून आत काम करत असलेले सगळे कामगार जीवाच्या भीतीने गोडाऊन बाहेर आले. त्यावेळी मुख्य गेटवर पोस्टला असलेले सु.र.सम्राट संगारे घटनास्थळी आले. गडबड होताच साप गोडाऊन मधून बाहेर गेटकडे येऊ लागला सकाळची वेळ असल्याने व्हिजीटर आणि कामगार ह्यांची मोठ्या प्रमाणात ये जा गेटवर सुरु होती काही महिला कामगार भयभीत झाल्या. सुरक्षा रक्षकाने कोणालाही जीवित हानी होऊ नये कींवा आणखी गदारोळ होऊन वित्त हानी होऊ नये म्हणून खूप प्रयत्न करून कोणतेही साधन नसताना त्या सापाला पकडून वातावरण नियंत्रणात आणले. सदर सर्पाला एका गोणीमध्ये बंद केले. सर्पमित्राशी संपर्क साधून त्यांच्यामार्फत सदर सर्पाला फॉरेस्ट डिपार्टमेंटला सुखरूप सुपूर्त केला. सदर प्रसंगी अस्थापनात असलेल्या कामगारांसोबतच त्या सापाचाही जीव वाचवला.

त्यांच्या ह्या धाडसी कृत्याचा सुरक्षा रक्षक मंडळाला आणि इंडियन ऑयल अस्थापनेला अभिमान आहे असे धाडस करून असामान्य आणि विशेष योगदान दिल्याने महाराष्ट्र दिनी झालेल्या कार्यक्रमात आपल्या ह्या कर्तव्यदक्ष सुरक्षा रक्षकाचा सन्मान माननीय माहीती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिषजी शेलार आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र शंकर क्षिरसागर ह्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. तद्प्रसंगी कामगार आयुक्त डॉ.एच.पी.तुम्मोड ह्यांची स्वाक्षरी असलेले सन्मान पत्र देऊन सु. र. सम्राट सिताराम संगारे ह्यांना सन्मानित करण्यात आले.