शक्तीपिठ मार्गाला शेकापचा विरोध
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी चांगले पिक घेऊन उत्पादन काढत आहे. पिकती शेतजमीन शक्तीपिठ महामार्गासाठी संपादित करण्याच्या हालचाली सूरू झाल्या आहेत. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात शेकापच्या वतीने दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. शक्तीपिठ महामार्गाला शेकापचा विरोध आहे, असे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे.
शक्तीपिठ रद्द करण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या आहेत. रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत असताना या रस्त्यावर वर्दळ कमी आहे. समांतर महामार्ग करण्याची गरज नाही. या शक्तीपिठ महामार्गामध्ये हजारो एकर बागायती शेती उध्वस्त होणार आहे. अनेक शेतकरी भूमीहीन होणार आहेत. नदी काठावरील गावामध्ये पुराचा प्रचंड मोठा धोका निर्माण होणार आहे. हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार या महामार्गामध्ये करून सरकारला निवडणूकीसाठी निधी तयार करायचा आहे. सांगली जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली मोजणी रोखण्यात आली आहे. त्याठिकाणी पोलीस बळाचा वापर केला जात आहे. तरीदेखील शेतकरी जमीन देण्यास तयार नाहीत. शासनाने कितीही दडपशाही केली, तरीही शेतकरी कामगार पक्ष या महामार्गाला कडाडून विरोध करणार आहे. सरकारने दडपशाही करू नये, अन्यथा राज्यभर अतितीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
——————————————