गणेश मूर्ती च्या किमतीमध्ये 25 टक्क्याने वाढ
पीओपीवरील बंदीच्या गोंधळाची गणेशभक्तांना झळ
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९३२०३२५९९३
अलिबाग:- गणपती उत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे त्यामुळे अलिबाग तालुक्यात अनेक गणेश शाळेत सध्या गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवाला जेमतेम महिना उरला असताना कारागीरांची घाई गडबड सुरू आहे. पीओपीच्या मूर्तींवरील बंदी उठल्याने मूर्तीकार खुश असले तरी यंदा गणेशमूर्तींच्या वाढत्या किंमतीची झळ गणेशभक्तांना बसणार आहे. यंदा गणेशमूर्तींच्या किंमती २५ टक्क्यांनी महागल्या आहेत.
अलिबाग तालुक्यात गणेशमूर्ती बनवणाऱ्या अनेक कार्यशाळा आहेत. ज्यातून गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरु असते, दरवर्षी साधारणपणे हजारो गणेशमूर्ती तयार केल्या जातात, यातून सुमारे लाखो रुपयांची उलाढाल होत असते. जवळपास हजारो लोकांना यातून रोजगार उपलब्ध होत असतो. मात्र या वर्षी या व्यवसायावर पीओपी गणेशमूर्ती बंदीचे सावट होते. याचा परिणाम गणेशमूर्तींच्या उत्पादनावर झाला आहे.
यंदा पीओपीवरील बंदीमुळे मुर्तीकारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. बहुतांश कार्यशाळांमध्ये काम ठप्प होते. तिथं काम सुरू होते ते मंदगतीने सुरू होते. कारागीरांनाही काम नव्हते यंदा गणेशमूर्ती शाडूमातीच्या बनवायच्या की पीओपीच्या याबाबतचा संभ्रम जूनच्या पहिल्या आठवडयापर्यंत कायम होता. त्यामुळे निराशाजनक परिस्थिती होती. याचा परिणाम गणेशमूर्तींच्या उत्पादन यंदा कमी झाले आहे.
९ जून महिन्यात पीओपी गणेशमूर्तींवरील बंदी उठली. त्यामुळे गणेशमूर्ती बनवण्याच्या कामाला पुन्हा वेग आला, पण दरवर्षीच्या तुलनेत तयार झालेल्या मूर्तींची संख्या कितीतरी कमी असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. बंदी उठल्यानंतर व्यावसायिकांनी मोठया प्रमाणात पीओपी गणेशमूर्तींची मागणी नोंदवायला सुरवात केली, परंतु आता वेळेअभावी मागणी इतका पुरवठा करू शकत नाही, असं मूर्तीकार सांगतात.
दरवर्षी कच्च्या मालांच्या किमती वाढल्याने साधारणपणे गणेशमूर्तींच्या किमतत १० ते १५ टक्क्यांची वाढ होत असते. यंदा ती वाढ आहेच, पण मागणीच्या तुलनेत गणेशमुर्तींची कमी उपलब्ध असल्याने किमती आणखिन १५ टक्क्यांची भर पडली आहे. त्यामुळे यावर्षी गणेशमूर्तींच्या किमती २५ टक्क्यांनी महागल्याचे गणेशमूर्तीकारांकडून सांगितले जात आहे.
माघी गणेशोत्सवापासूनच पीओपीवरील बंदीचा मुद्दा चर्चेत आला तेव्हापासूनच मूर्तीकारांमध्ये निराशा पसरली होती. आता बंदी उठली असली तरी एवढया कमी वेळात जेवढी मागणी आहे त्या प्रमाणात आम्ही पुरवठा करू शकत नाही. या परीस्थितीत मूर्तींच्या किंमती २५ टक्क्यांनी वाढवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.-
प्रथमेश म्हात्रे,
मूर्तीकार वाघ्रण