Home latest News गणेशोत्सव व ईद ए मिलाद शांततेत साजरे करण्यासाठी तलासरीत प्रशासनाची समन्वय बैठक

गणेशोत्सव व ईद ए मिलाद शांततेत साजरे करण्यासाठी तलासरीत प्रशासनाची समन्वय बैठक

82

गणेशोत्सव व ईद ए मिलाद शांततेत साजरे करण्यासाठी तलासरीत प्रशासनाची समन्वय बैठक

अरविंद बेंडगा
पालघर जिल्हा प्रतिनिधी

तलासरी :- तलासरी तालुक्यात गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे दोन्ही महत्त्वाचे सण शांततेत व सुरळीत पार पडावेत यासाठी दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत तहसीलदार कार्यालयात तालुका स्तरीय समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस हद्दीतील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, साऊंड सिस्टम धारक, शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक अशा 300 ते 350 लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी मा. अंकिता कणसे, तहसिलदार मा. अमोल पाठक, तसेच तलासरी पोलीस ठाण्याचे पोनि अजय गोरड यांनी उपस्थित राहून गणेशोत्सव आणि ईद मिलाद सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले. यावेळी मंडळांच्या व नागरिकांच्या प्रश्नांनाही विभाग प्रमुखांनी उत्तरे देत समन्वय साधला. या बैठकीत वीज वितरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, नगरपंचायत, बीडीओ कार्यालय आदींचे अधिकारीही सहभागी झाले होते.
बैठकीदरम्यान गणेश मंडळांनी आपल्या मंडळांची नोंदणी ऑनलाईन करण्याचे आवाहन करण्यात आले. लाऊडस्पीकर परवानगी घेणे अनिवार्य असून आवाज योग्य डेसिबल मर्यादेत ठेवावा, अन्यथा कायदेशीर कारवाई होईल असेही स्पष्ट करण्यात आले. गणेश मंडळांच्या ठिकाणी २४ तास स्वयंसेवक नेमावेत, श्रींच्या मूर्तीची विटंबना होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, तसेच कोणताही व्यक्ती मद्यपान करून सार्वजनिक शांतता भंग करणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या. मिरवणुकीदरम्यान वाहतुकीला अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्यावी, दिलेल्या मार्गानेच मिरवणूक काढावी व शक्य असल्यास मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असेही सांगण्यात आले.
यावेळी धार्मिक सलोखा राखण्यावर भर देण्यात आला. मिरवणुकीच्या वेळी इतर धर्मीयांच्या भावना दुखावतील असे वाद्य किंवा घोषणा देऊ नयेत, आक्षेपार्ह देखावे सादर करू नयेत आणि निसर्गपूरक तसेच सामाजिक संदेश देणारे आकर्षक देखावे मांडावेत, असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले. तसेच ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तूंचा वापर आणि सामाजिक प्रबोधन या विषयांवर आधारित उपक्रम राबविण्यास मंडळांना प्रोत्साहन देण्यात आले.
बैठकीचा समारोप करताना प्रशासनाने सर्व मंडळांना व नागरिकांना आवाहन केले की, गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण हे बंधुभाव, सलोखा आणि सामाजिक ऐक्य जपत साजरे करावेत. सण साजरे करताना कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.