गोरेगाव वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांकडून सहाय्यक प्रकल्प अधिकारी मधुकर जागले सरांचा सत्कार समारंभ
अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755
डहाणू :- गोरेगाव वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सहाय्यक प्रकल्प अधिकारी सन्मा. श्री. मधुकर जागले सर (डहाणू) यांचा सेवानिवृत्ती निमित्त भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. 31 ऑगस्ट 2025 रोजी जागले सर सेवेतून निवृत्त होत असून या निमित्ताने एकविरा फार्म, नरपड येथे हा निरोप समारंभ पार पडला.
मूळचे मोखाडा येथील असलेल्या जागले सरांनी 2003 ते 2009 या काळात गोरेगाव वसतिगृहात गृहपाल म्हणून कार्य केले. या काळात त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शिक्षणासह चारित्र्य आणि प्रामाणिकपणाचे धडे दिले. त्यांच्या प्रेरणेतून वसतिगृहातून डॉक्टर्स, इंजिनिअर्स, अधिकारी, शिक्षक, वकील, पोलिस अधिकारी, फार्मासिस्ट, फॉरेस्टर, उद्योजक तसेच राजकीय नेते अशी अनेक यशस्वी मंडळी घडली.
संयमी, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून लौकिक मिळवलेले जागले सरांनी गृहपाल ते सहाय्यक प्रकल्प अधिकारी असा खडतर प्रवास केला. या निरोप समारंभात त्यांनी आपल्या कार्यकालातील अनुभव, संघर्ष आणि आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाचे आयोजन इंजि. जितू दुमाडा, विपुल धोडी, नितीन हाडळ तसेच गोरेगाव वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांनी केले होते. समारंभात उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी जागले सरांना सेवानिवृत्त निरोप देत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.









