भंडारा जिल्ह्यातील माडगी येथील चमुचा आदर्श स्मार्ट ग्राम कळमना येथे अभ्यास दौरा

20

भंडारा जिल्ह्यातील माडगी येथील चमुचा आदर्श स्मार्ट ग्राम कळमना येथे अभ्यास दौरा

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा

राजुरा : 16 सप्टेंबर
भंडारा जिल्ह्यातील माडगी गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांची चमुने कळमना या आदर्श स्मार्ट गावाला अभ्यासदौऱ्यासाठी भेट देऊन ग्रामविकासाची बारकाईने पाहणी केली. कळमना हे गाव स्वच्छ, सुंदर, निर्मळ आणि पर्यावरणपूरक असल्यामुळे याला मॉडर्न जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त आहे. गावात नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी सामाजिक कार्याची निस्वार्थी भावना ठेवून गाव विकासासाठी झोकून दिलेले योगदान उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या कार्यातून उभे राहिलेले कळमना हे गाव आज शहरांनाही लाजवेल असे खऱ्या अर्थाने आदर्श बनले आहे.
माडगी येथील चमुने कळमना हे गाव युट्युबवर पाहिल्यानंतर प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, या उद्देशाने दौऱ्याचे आयोजन केले. गावातील प्रत्येक उपक्रमाची सखोल माहिती घेताना तेथील शाश्वत विकासाच्या संकल्पना पाहून ते भारावून गेले. या प्रसंगी माडगी येथील उपसरपंच पाल यांनी सांगितले की, “गावाचा सरपंच जर ध्येयवादी आणि विकासाभिमुख असेल तरच आदर्श गाव उभे राहते. नंदकिशोर वाढई यांनी कळमना गावाला सर्वार्थाने आदर्श बनवून दाखवले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक सरपंच व ग्रामस्थांनी कळमनाला भेट देऊन प्रेरणा घ्यावी. हे गाव राज्य व राष्ट्रीय पातळीवरही आदर्श ठरेल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तर आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी सांगितले की, “ सरपंचाकडे स्पष्ट ध्येय, कार्य करण्याची इच्छा व लोकसहभाग असेल, तर आदर्श गाव निर्माण होऊ शकते. कळमना हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. या यशाचे श्रेय संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याला जाते,” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला माडगीचे सरपंच गजभिये, उपसरपंच पाल, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष महादेव ताजणे, दिलीप निमकर, वनिता गोखरे, कार्यकर्ते सुरेश गौरकार, विठ्ठलराव वाढई, ग्रामपंचायत सदस्य रंजना दिवाकर पिंगे, ज्येष्ठ नागरिक देवाजी चापले, कवडू पाटील पिंगे, गणपती कुकुडे, सुभाष वाढई, रामदास वाढरे, क्षावण गेडाम, शेख बाबू, शंकर गेडाम, मिना भोयर, संगीता उमाटे (सीआरपी उमेद अभियान), सुचिता धांडे, कल्पना क्षिरसागर (आशा वर्कर), विविध बचत गटातील महिला तसेच समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.