Home latest News ग्रुप ग्रामपंचायत पेण तर्फे तळे कार्यक्षेत्रात विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज...

ग्रुप ग्रामपंचायत पेण तर्फे तळे कार्यक्षेत्रात विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा प्रारंभ

84

ग्रुप ग्रामपंचायत पेण तर्फे तळे कार्यक्षेत्रात विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा प्रारंभ

विश्वास गायकवाड
९८२२५८०२३२
बोरघर / माणगाव प्रतिनिधी

शासन स्तरावर सर्वत्र मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला बुधवार दिनांक १७ सप्टेंबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून दमदार सुरुवात झाली आहे. शासनाच्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ”राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता जन्म दिवस सेवा पंधरवडा” अर्थात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दिवस दिनांक १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर पर्यंत ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे. या कालावधीत विविध लोकाभिमुख उपक्रम राबविले जाणार असून, त्याचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळणार आहे. तर सदर अभियान चातुर्मास तथा चार महिने कालावधीत राबविले जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील पेण तर्फे तळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बुधवार दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता पेण तर्फे तळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील आमडोशी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरव मंदिराच्या भव्य प्रांगणात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून माजी विस्तार अधिकारी रमेश शिगवण यांची निवड करण्यात आली. सभेच्या प्रारंभी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनोगत तथा या अभियाना विषयीची ध्वनी फीत उपस्थितांना ऐकविली.
प्रशासक सरतापे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक अजय येलवे यांनी उपस्थितांना मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे शासन उद्दीष्ट, तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्य स्तरीय मोठ मोठी पारितोषिके आणि प्रभावी अंमलबजावणी विषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर खरवली तलाठी सजाचे तलाठी गणेश विटेकर तात्या यांनी या अभियानातील गाव नकाशा वरील पानंद रस्ते सीमांकन विषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर माजी विस्तार अधिकारी रमेश शिगवण,राजेश कासारे, पत्रकार विश्वास गायकवाड, मनोज पेणकर आणि विद्यानंद अधिकारी यांनी या अभियाना संदर्भात नागरिकांना पुरक माहिती दिली आणि त्याच बरोबर हे अभियान यशस्वी करण्यासाठी त्यांचा सक्रिय सहभाग आणि योगदान कीती महत्वपूर्ण आहे या बाबत जाणीव आणि जागृती केली.
तद्नंतर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पत्रकार विश्वास गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पेण ,आमडोशी आणि बोरघर गावातील विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रतिनिधींची एक संवाद कमिटी प्रस्थापित केली. या संवाद कमिटी च्या माध्यमातून पुढे गावनिहाय संवाद सभा,मिटींग घेऊन सदर अभियाना संदर्भात व्यापक अर्थाने जनजागृती करण्यात येणार आहे.
सदर विशेष ग्रामसभेला ग्रुप ग्रामपंचायत पेण तर्फे तळे कार्यक्षेत्रातील पेण,आमडोशी आणि बोरघर या तिन्ही गावातील ग्रामस्थ, महिला मंडळ, प्रतिष्ठीत मान्यवर, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, मदतनीस, पोलिस पाटील आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांच्या सक्रिय सहभाग,साथ सहयोग, सहकार्य आणि समन्वयाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.