Home latest News चिमूरात शेतकऱ्यांचा तीन तास रस्ता रोको

चिमूरात शेतकऱ्यांचा तीन तास रस्ता रोको

99

वाघाच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांनी अडवला राज्य महामार्ग

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चिमूर,28 ऑक्टोबर
तालुक्यातील शंकरपूर परिसरात वाढलेल्या वाघाच्या हल्ल्यांच्या घटनांमुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी मंगळवार, 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता कानपा-शंकरपूर-चिमूर राज्य महामार्गावरील शिवार फाटा येथे वाघाच्या बंदोबस्तासाठी तीन तासांचा रस्ता रोको आंदोलन करून वन विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
रविवारी सायंकाळी शंकरपूरपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवरा येथील शेतकरी नीलकंठ भुरे यांना स्वतःच्या शेतात वाघाने ठार केले होते. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाला एका दिवसाचा अवधी दिला होता. मात्र, दिलेल्या मुदतीत वाघाला पकडण्यात अपयश आल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरले.
गेल्या एका महिन्यात या परिसरात दोन जणांचा बळी वाघाने घेतला असून, मागील पंधरा दिवसांत बारा पाळीव जनावरे ठार केली आहेत. शिवरा, आंबोली, गडपिपरी, पुयारदंड, कवडशी, चिचाळा, लावारी या गावांमध्ये वाघाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. भीतीच्या वातावरणामुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत असून, कापूस वेचणी आणि धान कापणीची कामे ठप्प झाली आहेत.
रस्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर यांनी केले. त्यांच्यासह तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विजय गावंडे, माजी उपसभापती स्वप्नील मालके, माजी पंचायत समिती सदस्य राजू कापसे, माजी उपसभापती रोशन ढोक, सूर्योदन घूटके, वंचित बहुजन आघाडीचे शुभम मंडपे, शिवरा सरपंच अतुल ननावरे, शंकरपूरचे उपसरपंच अशोक चौधरी तसेच शेकडो शेतकरी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांनी चार दिवसांच्या आत वाघाला पकडण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले. दिलेल्या मुदतीत वाघाला न पकडल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिमूर ठाणेदार दिनेश लबडे आणि भीसी ठाणेदार मंगेश भोंगाडे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी उपस्थित होते.
======
पाळीव जनावर बांधून वाघाचा मागोवा : किशोर देऊळकर

वाघाच्या बंदोबस्तासाठी एक लाईव्ह कॅमेरा, 16 ट्रॅप कॅमेरे व 35 वन कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. वाघाची ओढख अजून पटली नसून त्यासाठी पाळीव जनावर बांधून मागोवा घेण्यात येत आहे. शेतकर्‍यांच्या सुरक्षेतेसाठी चार चम्मू तैनात करण्यात आले असून ते चमू शेताभोवती फिरणार आहे व एक चमू वाघाचा मार्ग शोधत आहे, अशी माहिती चिमूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांनी दिली.