स्मशानभूमी ‘व्हेंटिलेटरवर’ — बऱ्हाणपूर पाटिलपाड्यात ग्रामस्थांचे जीव धोक्यात!

101

स्मशानभूमी ‘व्हेंटिलेटरवर’ — बऱ्हाणपूर पाटिलपाड्यात ग्रामस्थांचे जीव धोक्यात!

भरत पुंजारा
पालघर तालुका प्रतिनिधी
मो. 9923824407

पालघर :- बऱ्हाणपूर पाटिलपाडा येथील स्मशानभूमी गेल्या १५ वर्षांपासून ग्रामस्थांच्या अंत्यविधीचे ठिकाण असली, तरी आता तीच स्मशानभूमी गावकऱ्यांच्या जीवाला धोका ठरत आहे. काळाच्या ओघात ही स्मशानभूमी पूर्णपणे मोडकळीस आली असून, ती त्वरित दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
सदर स्मशानभूमीतील सर्व पत्रे वाऱ्यामुळे उडून गेली असून, लोखंडी एंगल पूर्णपणे गंजून कमकुवत झाली आहेत. यामुळे अंत्यसंस्कार करताना कोणत्याही वेळी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच धोकादायक ठरते.
बऱ्हाणपूर पाटिलपाड्यात सुमारे ४०० पेक्षा अधिक लोकसंख्या राहत असून, सर्वांना या मोडकळीस आलेल्या स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यामुळे प्रत्येक अंत्यविधी ही एकप्रकारे जीव धोक्यात घालून करावी लागणारी जबाबदारी बनली आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेत सांगितले की, “आजही अनेक गावांमध्ये स्मशानभूमी नाही, आणि जिथे आहेत तिथे त्या अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष द्यावे, ज्या गावात स्मशानभूमी नाही त्या ठिकाणी नवी स्मशानभूमी उभारावी आणि बऱ्हाणपूर पाटिलपाड्यातील स्मशानभूमीचे नूतनीकरण किंवा नवीन बांधकाम करावे.”
ग्रामस्थांची ही मागणी केवळ सुविधेसाठी नव्हे, तर मानवी सन्मानासाठी आहे. मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारास योग्य व सुरक्षित जागा मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.