पनवेल : शिक्षण क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी जपत लोकनेते रामशेठ ठाकूर, सौ. शकुंतला ठाकूर आणि ठाकूर इंफ्राप्रोजेक्ट लिमिटेड यांनी रयत शिक्षण संस्थेला यंदा तब्बल ३ कोटी ६२ लाख रुपयांची देणगी दिली. या उल्लेखनीय योगदानाबद्दल सातारा येथील कर्मवीर भूमीत संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ठाकूर कुटुंबाचा जाहीर सत्कार करण्यात आला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हा गौरव सोहळा पार पडला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आतापर्यंत रयत शिक्षण संस्थेला शंभर कोटींहून अधिक आर्थिक मदत करून शिक्षण क्षेत्रात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सातत्याने मदतीचा हात दिला आहे.
रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी असलेल्या रामशेठ ठाकूर यांनी ‘कमवा आणि शिका’ योजनेत सहभाग घेत शिक्षक म्हणूनही सेवा बजावली होती. स्वतःची शिक्षण संस्था असतानाही रयतला मातृसंस्था मानत त्यांनी संस्थेच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे.
या कार्यक्रमात परेश ठाकूर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेच्या विविध शाखा, शिक्षक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले.
कृष्णा गायकवाड









