Home latest News रेल्वे अपघातांवर आळा घालण्यासाठी भिवंडीत पहिला ऑल वेदर सबवे

रेल्वे अपघातांवर आळा घालण्यासाठी भिवंडीत पहिला ऑल वेदर सबवे

17

दि.११, भिवंडी (ठाणे) : मुंबईत रेल्वे रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक नवीन योजना आखली आहे. आता प्रवाशांना रुळ ओलांडण्यासाठी त्यांच्या जीव धोक्यात घालण्याची गरज पडणार नाही, त्याऐवजी रुळांच्या खाली सुरक्षित भुयारी मार्ग म्हणजे सबवे तयार केला जात आहे. विशेष गोष्ट म्हणजे देशातील पहिला ऑल वेदर सबवे भिवंडी परिसरात उभारला जात आहे आणि तो पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न सुरु आहे.

मुंबई आणि उपनगरातील परिसरात दररोज हजारो प्रवासी हे वेळ वाचवण्यासाठी शॉर्टकटचा वापर करताना दिसून येतात. मात्र काही क्षणांची ही गोष्ट जीवावर बेतते. पावसाळ्यात ही अडचण जास्त वाढते. आता या समस्येवर कायमचा आणि सुरक्षित उपाय शोधण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हे वेगळे पाऊल उचलले आहे.दरम्यान पावसाळ्याच्या दिवसांत बऱ्याच सबवेमध्ये पाणी साचणे, अंधार अशा समस्या दिसून येतात. त्यामुळे नवीन सबवे तयार करताना विशेष काळजी घेण्यात आलेली आहे. हा सबवे पूर्णपणे वॉटरप्रूफ असणार आहे. त्यासाठी तीन स्तरांचे वॉटरप्रूफ तंत्रज्ञान वापरले जात आहे तसेच सबवेच्या जोडणीच्या भागात रबर गॅस्केट बसवले जाणार आहे. या गोष्टीमुळे सबवेच्या आत पाणी जाणार नाही.

या प्रकल्पासाठी भिवंडीची खास निवडही करण्यात आली आहे. या भागातून दररोज उपनगरीय रेल्वे, मेल-एक्स्प्रेस आणि मालगाड्यांसह तब्बल सात रेल्वे मार्ग जातात. त्यामुळेच येथे हा नवा प्रकल्प यशस्वी ठरल्यास तो इतर देशातील भागांमध्ये करणे सोपे जाईल. तसेच रेल्वे रुळांची मजबुती कायम राहावी म्हणून रुळांच्या खाली मजबूत लोखंडी गर्डरही बसवण्यात आले आहे.

संजय पंडित