Home latest News दोन हजार ड्रोनच्या सहाय्याने आकाशात साकारले डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण

दोन हजार ड्रोनच्या सहाय्याने आकाशात साकारले डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण

14

पनवेल : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने मुंबईत दादर शिवाजीपार्क येथे प्रथमच ड्रोन शो व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, आमदार अमित साटम, योगेश सागर, प्रसाद लाड, कॅप्टन तमिळ आर सेल्वन, महापौर रितु तावडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, सिध्दीविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर, भंते डॉ. राहुल बोधी महाथेरो तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या ड्रोन शो व्दारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन करण्यात आले. सुमारे दोन हजार ड्रोनच्या सहाय्याने आकाशात साकारण्यात आलेली प्रकाशचित्रे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या प्रकाश चित्रांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील महत्वपुर्ण क्षणांचे टप्पे प्रभावीपणे उलगडण्यात आले. तसेच भारतीय संविधानाचे महत्व अधोरेखित करणारी विलोभनीय दृश्ये साकारण्यात आली. महामानवाने घडविलेल्या सामाजिक क्रांतीचा प्रेरणादायी प्रवासही या ड्रोन शो मधुन जीवंत करण्यात आला. यावेळी गायिका वैशाली माडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भरविण्यात येणाऱ्या पुस्तक प्रदर्शनांचा विशेष उल्लेख करत, बाबासाहेबांचे विचार समजून घेणे आणि आत्मसात करण्यासाठी वाचनाची सवय जोपासावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी देशातील लाखो करोडो अनुयायी एकत्र येऊन अभिवादन करतात, ही त्यांच्या कार्याची खरी पोचपावती असल्याचे त्यांनी सांगितले.

सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेले समानता, समान संधी आणि सामाजिक जबाबदारी यावर आधारित विचार आजही मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या यशाची गुरुकिल्ली त्यांच्या तत्वज्ञानातच दडलेली आहे. भारतीय संविधान हे जगासाठी मार्गदर्शक ठरणारे असून, त्यावर उभारलेली लोकशाही व्यवस्था, प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय व्यवस्था ही समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत न्याय पोहचविण्याचे काम करत आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान व त्यांच्या विचारांमुळेच समाजातील सर्व घटकांना समान हक्क आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळालेली आहे. ड्रोन शो या अभिनव उपक्रमातून नागरिकांना आकाशात त्यांच्या कार्याचे नेत्रदीपक दर्शन घडवले. त्यांच्या विचारांचा जागर देशभरासह जागतिक स्तरावर होत असून, अशा अभिनव उपक्रमांतून नव्या पिढीपर्यंत त्यांचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अरुणकुमार करंदीकर

पनवेल