अच्युत पौळ
कळंब, प्रतिनिधी :- राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा पुरस्कार विद्याभवन हायस्कूल कळंब या प्रशालेतील मराठी विभाग प्रमुख व नवोपक्रमशील शिक्षक सोपान पवार यांची क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी समितीने निवड केलेली आहे. पुरस्कार वितरण पनवेल येथे होणार आहे.
सोपान पवार यांनी अध्यापन कार्याबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, वृक्ष संवर्धन असे विविध कार्य केले आहे. महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित मराठी विषयाचे राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर मराठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य निवड, सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण राज्यस्तर मास्टर ट्रेनर म्हणून कार्य केले आहे.
महाराष्ट्र शासन राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे पाठ्यपुस्तक निर्मिती सदस्य कार्यशाळेसाठी निवड, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद विद्या प्राधिकरण पुणे आयोजित नवोपक्रम स्पर्धेत राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर नवोपक्रमाची निवड व पारितोषिक प्राप्त झाले आहे.
निबंध लेखन स्वरूप आणि दिशा, निबंध लेखनाची प्रेरणा आणि नवदिशा, गुणवंताची भाषणे ही पुस्तके प्रकाशित झाली असून शैक्षणिक लेख वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मराठी परिषदांमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध, सावित्रीबाई फुले गौरव ग्रंथात लेख प्रसिद्ध, दिवाळी अंकात कथा प्रसिद्ध, काव्यसंग्रहात कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.
अनेक कवी संमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून कार्य, विविध विषयावर लेखन, अनेक शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे मार्गदर्शन, महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे शैक्षणिक साहित्य निर्मिती तालुकास्तर प्रथम क्रमांक, पारितोषिक प्राप्त, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे लेखक कार्यशाळेसाठी निवड, राज्यस्तर जिल्हास्तर अनेक निबंधांना पारितोषिक व पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या समितीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सोपान पवार यांची निवड केली आहे. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहेकर, सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक कुंभार व्ही. जी., उपमुख्याध्यापक मयाचारी व्ही. एस., पर्यवेक्षक कोळी मॅडम, प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपले, राज्य सरचिटणीस संतोष भोजने, धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश काका टेकाळे, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला धाराशिव जिल्हा अध्यक्ष Dr. गिरीश कुलकर्णी, प्राचार्य महादेव गपाट, प्रदीप यादव आदींनी अभिनंदन केले.









