Home मुंबई ‘मुक्त’ची भाषा राजकारणात, संघात नव्हे: भागवत

‘मुक्त’ची भाषा राजकारणात, संघात नव्हे: भागवत

80

 

पुणे – ‘मुक्त’ची भाषा राजकारणात चालते; राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आम्ही ही भाषा मुळीच करत नाही. सारा समाज आम्हाला संघटित करायचा आहे. विरोध करणाऱ्यालाही आम्हाला सोबत न्यायचे आहे. राष्ट्रउभारणीच्या कामात तोही आमचा सहप्रवासी आहे. राष्ट्राच्या उभारणीसाठी चाललेल्या प्रयत्नांची दिशा ही समावेशक असली पाहिजे, असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘काँग्रेसमुक्त’, ‘संघमुक्त’ आणि ‘मोदीमुक्त’ अशी भाषा बोलणाऱ्यांना राष्ट्रउभारणीचे धडे दिले.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे रविवारी आयोजित कार्यक्रमात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे लिखित व अनुवादित ‘माती, पंख नि आकाश’, ‘पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया’,‘शांती की अफवांए’, ‘होतच नाही जी सकाळ’, ‘ज्ञानेश्वर मुळे की कविताए: प्रातिनिधीक संलकन’ या पुस्तकांचे प्रकाशन सरसंघचालक भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संदीप वासलेकर या प्रसंगी उपस्थित होते.
मोहन भागवत म्हणाले, ‘मुण्डे मुण्डे मतिर्भिन्ना’ या प्रमाणे प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असू शकतात. विचार सगळ्यांचे जुळणे अशक्य आहे. परंतु, दृष्टिकोन वेगळा, विचार वेगळा असताना एका ध्येयाकडे वाटचाल करता येऊ शकते. भगिनी निवेदिता यांच्या म्हणण्यानुसार, भिन्न रुचीच्या व्यक्तीला सोबत घेत एका ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा युरोपीय लोकांचा गुण भारतीयांना शिकावा लागेल.