माणगाव | प्रतिनिधी : राम सिताराम भोस्तेकर
माणगाव तालुक्यातील कळमजे गावचे सुपुत्र तथा समाजहितासाठी सातत्याने कार्यरत असलेले संतोष संगीता सिताराम खाडे यांना सामाजिक, शैक्षणिक व जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा “डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसीरत्न पुरस्कार २०२६” प्रदान करून गौरविण्यात आले.
राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यात दि. ५ जून २०२६ रोजी हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
समाजातील वंचित, दुर्बल व गरजू घटकांसाठी सातत्याने केलेले कार्य, विविध सामाजिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग तसेच समाजप्रबोधनासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची राज्यस्तरावर दखल घेत हा सन्मान देण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे समाजात प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.
या गौरवामुळे कळमजे गावासह संपूर्ण माणगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामस्थ, मित्रपरिवार, सामाजिक संस्था तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी संतोष खाडे यांनी हा सन्मान समाजातील सर्व सहकाऱ्यांना समर्पित करत भविष्यात अधिक जोमाने समाजहिताचे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव हा सकारात्मक परिवर्तनाला बळ देणारा असतो. संतोष खाडे यांचा हा सन्मान अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.









