मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार सोहळ्याचे उद्घाटन
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
चंद्रपूर : विठू माऊलीच्या दर्शनाची आस आणि संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयघोषात, सकल तेली समाज महासंघ, चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित ‘श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पायदळ पालखी वारी सोहळा व सत्कार सोहळा’ येत्या शुक्रवार, १२ जून रोजी सकाळी ११:३० वाजता अत्यंत उत्साहात पार पडणार आहे.
श्री संताजी जगनाडे महाराज यांची ही पायदळ पालखी चंद्रपूर ते शिरपूर असा तब्बल ४२ दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहोचणार आहे. गेल्या अनेक वर्षांची ही अखंड परंपरा असून, संताजी परिवार व गुरुदेव परिवारातील वारकरी ही वारी पूर्ण करतात. विशेष म्हणजे, या वारीमध्ये केवळ एका समाजाचे नव्हे, तर सर्वधर्मीय आणि सर्व समाजातील भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवितात.
या दिमाखदार पालखी सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अध्यक्षस्थानी आमदार सुधीर मुनगंटीवार, प्रमुख उपस्थिती आ. विजय वडेट्टीवार, आ. ॲड. अभिजित वंजारी, आ. किशोर जोरगेवार, विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. संजय बेले आणि आयोजक तथा सकल तेली समाज महासंघाचे राजेश बेले यांची उपस्थिती लाभणार आहे.
सकल तेली समाज महासंघ, चंद्रपूर यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व समाजातील नागरिकांनी, भाविकांनी आणि विठ्ठल भक्तांनी या भव्य पालखी प्रस्थान व सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे विनम्र आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात आयोजित पत्रपरिषदेत राजेश बेले, डॉ. संजय बेले, रवि लोणकर, आकाश साखरकर, सोहम बुटले, चंदा ईटनकर, कोकीबा पोटदुखे, रोहन घोंगळे, दादाजी अगडे, मुक्ताई लोखंडे, सुनंदा येनुरकर, कविता वैरागडे, वर्धन चवरे, कल्पना गिरडकर, योगिता पोटदुखे, सुवर्णा लोखंडे, कुमुद खनके, वैशाली गिरडकर, अनिता वैरागडे, अनिता हजारे, ज्योती येनुरकर, शुभांगी चवरे, हेमलता चवरे, विधा चवरे, रमेश खनके व गणेश येरणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









