श्रीवर्धन | प्रतिनिधी: श्रीवर्धन शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रानवली धरण परिसरात सुरू असलेल्या गाळ उपसा कामाबाबत नागरिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. गाळ काढण्याच्या नावाखाली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक टेकड्या व उंचवटे तोडून मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गाळ उपशासाठी मंजुरी असताना प्रत्यक्षात जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर माती काढण्यात आली. गेल्या काही दिवसांत धरण परिसरातून मोठ्या क्षमतेच्या डंपरद्वारे माती बाहेर नेण्यात आल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या कामाच्या स्वरूपाबाबत संशय अधिक गडद झाला आहे.
डंपरच्या फेऱ्यांमुळे वाढला संशय
गेल्या पंधरा दिवसांपासून धरण परिसरात डंपरची सतत वाहतूक सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले. १० चाकी डंपरच्या क्षमतेचा विचार करता हजारो टन माती परिसरातून हलविण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या उत्खननासाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, तसेच संबंधित रॉयल्टी शासनाकडे भरली गेली होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
पर्यावरणीय परिणामांची भीती
धरण परिसरातील नैसर्गिक टेकड्या व उंचवटे हे पाण्याचा प्रवाह नियंत्रित ठेवण्यास आणि जलसाठा टिकवून ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. या भूभागात मोठ्या प्रमाणात बदल झाल्यास भविष्यात धरणाच्या साठवण क्षमतेवर, जलपुरवठ्यावर आणि पर्यावरणीय संतुलनावर परिणाम होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
काही जाणकारांनी धरणाच्या विशिष्ट भागात अतिखोलीकरण झाल्याचाही दावा केला असून, त्यामुळे भविष्यात धरणाच्या संरचनात्मक सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात, असे मत व्यक्त केले आहे. मात्र या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
संयुक्त पाहणीची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, काढण्यात आलेल्या गाळ किंवा मातीचे अधिकृत मोजमाप जाहीर करण्यात यावे, तसेच पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, स्थानिक नागरिक, पत्रकार आणि सामाजिक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संयुक्त पाहणी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
इतक्या मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री आणि डंपरची वाहतूक सुरू असताना संबंधित विभागांकडून नियमित देखरेख करण्यात आली होती का, असा सवालही उपस्थित होत आहे. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी व इतर सक्षम यंत्रणांकडे तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
*रानवली धरणातील गाळ उपसा कामाबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे आता प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण श्रीवर्धन तालुक्याचे लक्ष लागले आहे.*
————————————————-
रानवली येथील धरण इरिगेशन डिपारमेंटच्या अंतर्गत येते. प्राप्त माहिती नुसार संबंधित खात्याने टेंडर प्रोसिजर करून सदरचे टेंडर संबंधितांना दिले होते. जर सदरच्या गाळ उपसा मध्ये काही चुकीच्या गोष्टी केल्या गेल्या असतील, उंचावटे तोडण्यात आले असतील, किंवा प्रचलित कायद्याच्या विरुद्ध कोणती कृती करण्यात आली असेल तर मी संबंधित खात्याला विनंती करेन की सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
ॲड. अतुल चौगुले, नगराध्यक्ष, श्रीवर्धन नगरपरिषद









