Home latest News जेम्स लेनच्या पुस्तकातील आक्षेपार्ह लिखाणाबद्दल अखेर आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा माफीनामा जाहीर

जेम्स लेनच्या पुस्तकातील आक्षेपार्ह लिखाणाबद्दल अखेर आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा माफीनामा जाहीर

70

जेम्स लेनच्या पुस्तकातील आक्षेपार्ह लिखाणाबद्दल
अखेर आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा माफीनामा जाहीर

अरुणकुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
मो.क्र. 7715918136

पनवेल : अमेरिकन लेखक जेम्स लेन यांनी लिहिलेल्या ‘ शिवाजी, हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया ‘ ह्या पुस्तकात राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण केले होते. दोन दशकांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकात राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला होता . त्यासंदर्भात आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडिया प्रकाशनाने आता प्रेस नोटीस प्रसिध्द करुन छत्रपतींचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांची थेट जाहीरपणे माफी मागितली आहे.

अमेरिकन इतिहास अभ्यासक जेम्स लेन यांचे ‘ शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया ‘ हे इंग्रजी पुस्तक 13 फेब्रुवारी 2003 रोजी प्रकाशित करण्यात आले होते. सदर पुस्तकात पान क्रमांक 31, 33 , 34 आणि 93 वर राजमाता जिजाऊ व शिवरायांबद्दल केलेली विधाने कोणत्याही पडताळणी शिवाय प्रकाशित केल्याची चुक आता कबुल केली आहे. तसेच यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे मान्य केले असुन त्याबद्दल आम्हाला मनापासून वाईट वाटत आहे. म्हणून त्यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि सर्व शिवप्रेमी जनतेची दिलगिरी व्यक्त करुन माफी मागितली आहे. सदर प्रकरणाबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी न्यायालयात धाव घेतली होती. आता त्याच्या सुनावणी दरम्यान आक्षेपार्ह लिखाणाबद्दल 22 वर्षांनंतर आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीने त्यांची लेखी माफी मागितली आहे.

सदर पुस्तकातील आक्षेपार्ह लिखाणाच्या विरोधात महाराष्ट्रात विशेषत पुण्यात हिंसक पडसाद उमटले होते.पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेमधील काही तथाकथित इतिहासकारांनी अमेरिकन इतिहासकार जेम्स लेन यांना चुकीची खोटी माहिती देऊन लेखन करण्यास मदत केल्याचा आरोप महाराष्ट्रातील इतिहास संशोधक, तज्ञ , इतिहासकारांनी आणि जनतेने केला होता. तसेच भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या इतिहास तज्ञांवर जोरदार टिका केली होती. त्यामुळे फार मोठा वाद निर्माण झाला होता.

आता हा लेखी माफीनामा सादर झाल्यानंतर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी जोरदार टिकास्त्र सोडले आहे. ” जेम्स लेनच्या पुस्तकातील लिखाण अत्यंत विकृत आहे. त्या लिखाणामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. तो मजकूर काढून टाकावा तसेच त्या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी आणि त्यांनी माफी मागावी. अशी मागणी त्यावेळी शिवप्रेमींनी केली होती. आता 22 वर्षांंनी आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीला कशी काय उपरती झाली ? ते आता म्हणतायेत की , त्या लिखाणाबद्दल पुरावे नाहीत म्हणून आम्ही माफी मागतोय. मग आतापर्यंत 22 वर्षात त्यांनी कायम संशोधन केले , त्याबद्दल सविस्तर खुलासा केला पाहिजे. फक्त चार ओळीत माफी मागुन चालणार नाही. त्यावेळी महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवणारे काम त्यांनी केले होते. ब्राह्मण – ब्राम्हणेत्तर वाद घडवुन आणला होता. आता त्याबद्दल चार ओळीत माफी, हे पटण्यासारखे नाही. जेम्स लेनच्या लिखाणाचे समर्थन करणा-या ज्या प्रवृत्ती महाराष्ट्रात होत्या , त्यांनी स्वतःचे तोंड परत आरशात बघावे आणि स्वतः मध्ये सुधारणा करून घ्याव्यात. असे इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे.