नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांचा माथेरान स्वच्छ व सुंदर करण्याचा निर्धार
दिनेश सुतार, माथेरान:पर्यटन स्थळ असलेले माथेरान हे कचरा व प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी केला आहे.
दररोज हजारो पर्यटक माथेरानला भेट देत असतात यातून उत्पन्न होणारा कचरा व प्लास्टिक यावर उपाययोजना करण्यासाठी कचरा व्यवस्थापनाचे नियोजन योग्य पद्धतीने होत नसल्याने या कचऱ्याची समस्या जटील होत चालली होती. यामुळे माथेरान नगरपरिषदेला कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. काही दिवसापूर्वी चंद्रकांत चौधरी यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारत कचरा व्यवस्थापनाबरोबर बैठका घेऊन नागरिकांनी कचरा योग्य ठिकाणी टाकणे आणि स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती करण्याचे आव्हान केले आहे तर स्वच्छता ही केवळ वैयक्तिक नसून सामाजिक जबाबदारी आहे.

ही बाब प्रत्यक्षात उतरावण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेच्या स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जाव्यात असे मार्गदर्शन प्रशासनाला केले आहे.याबरोबर शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यावरील दररोज प्लास्टिक,कचरा तसेच धुळीचे लोळ, रस्त्यावर पडलेली घोड्याची लीद कचरा व्यवस्थापनाकडून युद्ध पातळीवर स्वच्छतेसाठी सुरुवात देखील करण्यात आली आहे. नगराध्यक्षांच्या या कृतीमुळे नागरिक तसेच पर्यटकांनी समाधान व्यक्त केले असून भविष्यात माथेरान स्वच्छ भारत अभियानात अव्वल ठरेल असा विश्वास देखील चंद्रकांत चौधरी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.









