Home latest News चिंचवळीचे सरपंच नंदकुमार पारावे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार

चिंचवळीचे सरपंच नंदकुमार पारावे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार

14

माणगाव तालुक्यातील चिंचवळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच नंदकुमार पारावे यांना विवा कॉलेज एज्युकेशन सोसायटी, माणगाव यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय “आदर्श सरपंच पुरस्कार” नुकताच जाहीर झाला आहे. त्यांच्या या निवडीमुळे चिंचवळी गावासह संपूर्ण माणगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नंदकुमार पारावे यांनी सरपंच म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते विकास, सामाजिक उपक्रम, ग्रामस्थांशी सुसंवाद तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गावातील विविध विकासकामांना गती देत ग्रामस्थांचा विश्वास संपादन करण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

तसेच सामाजिक बांधिलकी जपत युवकांना प्रोत्साहन, महिला बचत गटांना सहकार्य आणि ग्रामविकासाच्या विविध योजनांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची दखल घेत विवा कॉलेज एज्युकेशन सोसायटी, माणगाव यांच्या वतीने त्यांची राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

या पुरस्काराबद्दल विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थांकडून नंदकुमार पारावे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील सामाजिक व विकासात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

राम भोस्तेकर | माणगाव प्रतिनिधी