अलिबाग :- राज्यातील शाळांच्या जिओ टॅगिंग प्रक्रियेत रायगड जिल्ह्याने जवळपास शंभर टक्के कामगिरी साध्य केली आहे. जिल्ह्यातील 3,569 शाळांपैकी 3,568 शाळांचे जिओ टॅगिंग पूर्ण झाले असून केवळ एका शाळेचे काम तांत्रिक अडचणीमुळे थांबले आहे. त्यामुळे रायगडचा टक्का 99.97 इतका झाला आहे.
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर [MRSCA] च्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या या प्रक्रियेत राज्यातील 1 लाख 8 हजार 15 शाळांपैकी 1 लाख 6 हजार 74 शाळांचे जिओ टॅगिंग पूर्ण झाले आहे. मात्र 1,941 शाळा अजूनही या प्रक्रियेपासून दूर आहेत.
राज्यात गडचिरोली, नंदुरबार, धारशिव, बुलढाणा आणि भंडारा हे पाच जिल्हे असे आहेत जिथे शंभर टक्के शाळांचे जिओ टॅगिंग पूर्ण झाले आहे. याउलट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 452, नागपूरमध्ये 353, कोल्हापूरमध्ये 158, धुळ्यात 127, नाशिकमध्ये 122, सांगलीत 120 आणि जालना जिल्ह्यात 116 शाळांची प्रक्रिया प्रलंबित आहे.
जिओ टॅगिंगद्वारे शाळांची लोकेशन, विद्यार्थी-शिक्षक संख्या, उपलब्ध भौतिक व संगणकीय सुविधा यांची माहिती यूडायस प्लस संकेतस्थळावर नोंदवली जाते. गाव, वस्तीचे स्थान, लोकसंख्या घनता, रस्ते, शाळांमधील अंतर आणि इतर सरकारी सुविधांची माहिती मिळवून शैक्षणिक धोरणे व कार्यक्रमांची आखणी करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सहसंचालक श्रीराम पानझाडे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना 13 मेपर्यंत सर्व शाळांचे जिओ टॅगिंग पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अँड. रत्नाकर पाटील









