मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर जाणाऱ्या नोंदणीकृत पदवीधरांच्या दहा जागांसाठी रविवारी सरासरी ४० टक्के मतदान झाल्याची माहिती विद्यापीठाच्या निवडणूक विभागाने दिली. मतमोजणी मंगळवारी २७ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या संख्येसंदर्भात माहिती गोळा करण्याचे काम सुरू होते. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजांतील ५३ मतदान केंद्रांवर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत हे मतदान पार पडले. दहा जागांसाठी ६८ उमेदवार रिंगणात होते. अधिसभेच्या ६२ हजार ५५९ पदवीधर मतदारांपैकी केवळ २५ हजार पदवीधरांनी रविवारी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या वेळी युवासेना आणि अभाविप या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये चुरस पहायला मिळाली. युवासेनेने विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीत बाजी मारली आहे. या पार्श्वभूमीवर ‘पदवीधर’मध्येही आपल्या सर्व जागा याव्यात यासाठी युवासेनेचे प्रयत्न सुरू होते. गेल्या वर्षी युवासेनेच्या विरोधात मनविसेने टक्कर दिली होती. त्यामुळे युवासेनेला आठ आणि मनविसेला दोन जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत मनविसे बाहेर राहिल्याने अभाविप विरोधात आहे. निवडणुकीत मनविसेचे अधिकृत उमेदवार नसले तरी दोन उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. छात्रभारती, प्रहार, एनएसयूआय या विद्यार्थी संघटनांचेही उमेदवार रिंगणात होते.








