Home latest News गोरेगाव बस स्टॉप चौकातील राष्ट्रीय प्रतीक अशोक स्तंभ अतिक्रमण आणि अस्वच्छतेच्या विळख्यात

गोरेगाव बस स्टॉप चौकातील राष्ट्रीय प्रतीक अशोक स्तंभ अतिक्रमण आणि अस्वच्छतेच्या विळख्यात

80

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे राष्ट्रीय प्रतीकाची गरिमा धोक्यात – सामाजिक कार्यकर्ते सतनाम राऊत यांचा इशारा

गोरेगाव ,प्रतिनिधी: गोरेगाव भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून ओळखला जाणारा अशोक स्तंभ हा देशाच्या संविधानिक मूल्यांचा, न्यायव्यवस्थेचा आणि राष्ट्राच्या एकात्मतेचा गौरवशाली प्रतीक मानला जातो. गोरेगाव शहरातील मुख्य बस स्टॉप चौकात नगरपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेली अशोक स्तंभाची प्रतिकृती आज अतिक्रमण, अस्वच्छता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आपली ओळख गमावत असल्याचे चित्र समोर येत आहे.

गोरेगाव तालुक्यातील मुख्य बस स्टॉप चौक हा अत्यंत महत्त्वाचा आणि गर्दीचा परिसर आहे. या चौकात हजारो नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व प्रवासी दररोज ये-जा करतात. अशा प्रमुख ठिकाणी उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रतीकाच्या अवतीभोवती सध्या हातगाड्या, फेरीवाले आणि तात्पुरती दुकाने मोठ्या प्रमाणात लावली जात आहेत. काही व्यापाऱ्यांनी तर थेट अशोक स्तंभासमोरच दुकाने उभारल्यामुळे या राष्ट्रीय प्रतीकाचे अस्तित्वच झाकले जात आहे.

याशिवाय स्तंभाभोवती मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक, सांडपाणी आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात दुर्गंधी पसरत असून राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक स्तंभाच्या ठिकाणीच अस्वच्छतेचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे या प्रतीकाची गरिमा, प्रतिष्ठा आणि पवित्रता धोक्यात आल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

सामाजिक कार्यकर्ते सतनाम राऊत (प्रभाग क्रमांक 12) यांनी या गंभीर प्रकाराबाबत प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, “अशोक स्तंभ हा केवळ सजावटीचा भाग नसून तो भारताच्या संविधानाचा आणि राष्ट्राच्या अस्मितेचा प्रतीक आहे. या राष्ट्रीय प्रतीकाभोवती अतिक्रमण, दुकाने आणि घाणीचे साम्राज्य निर्माण होणे अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ कारवाई करून अवैध दुकाने हटवावीत आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी.”

भारतीय संविधानाच्या कलम 51(अ) नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाचे हे मूलभूत कर्तव्य आहे की, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान राखावा. तसेच “State Emblem of India (Prohibition of Improper Use) Act, 2005” अंतर्गत राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान, गैरवापर किंवा त्यांची प्रतिष्ठा कमी होईल असे कृत्य टाळणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे मत कायदेतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, नगरपंचायत प्रशासनाने वेळोवेळी अतिक्रमण हटविण्याच्या घोषणा केल्या; मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे फेरीवाल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी चौकातील वाहतूक कोंडी वाढत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सतनाम राऊत यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की

“राष्ट्रीय प्रतीकाचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. जर प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही, तर नागरिकांच्या सहभागातून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

गोरेगाव शहरातील सुजाण नागरिकांनी देखील अशोक स्तंभ परिसर कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त करून तेथे स्वच्छता, सुशोभीकरण आणि सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय प्रतीकाचा सन्मान राखण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.