चिमूर वनपरिक्षेत्रातील डोमा बीट परिसरातील घटना
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा/चिमूर, 27 ऑक्टोबर
चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर उपवन क्षेत्रांतर्गत येणार्या डोमा बीटातील शिवरा येथे रविवारी, 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी वाघाच्या हल्ल्यात एका शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर, रात्री 12 वाजताच्या सुमारास मृतदेह आढळला. नीलकंठ भुरे (60) असे मृत शेतकर्याचे नाव असून ते या गावाचे माजी सरपंच होते. या महिन्यातील परिसरातील ही दुसरी घटना आहे. असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नीलकंठ भुरे हे रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास शेतावर पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. शेतातच वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. वाघाने मृतदेह ओढत नेऊन नाल्याच्या काठावर ठेवला होता. रात्री 8 वाजतापर्यंत ते घरी परतले नाही म्हणून घरच्यांनी शोधमोहीम सुरू केली. शेतात त्यांची सायकल आढळून आल्याने संशय वाढला व गावातील 30 ते 40 नागरिकांसह पुन्हा शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह खाल्लेल्या अवस्थेत नाल्या काठी आढळला.
घटनेची माहिती मिळताच, चिमूर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, वनक्षेत्रपाल यू. बी. लोखंडे, वनरक्षक बुरले यांच्यासह भिसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार भोंगाडे, पोलिस उपनिरीक्षक थूटे व पोलिस हवालदार घोडमारे उपस्थित होते. दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजुकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती रोशन ढोक तसेच शिवराचे सरपंच अतुल नन्नावरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकारी येईपर्यंत मृतदेह हलवू न देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. अखेर पहाटे सोमवारी 1.30 वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी देऊळकर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्यात येईल व मृतकाच्या कुटुंबाला शासकीय मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले. तात्काळ कुटुंबाला 30 हजार रुपये रोख व 9 लाख 70 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यानंतर मृतदेह चिमूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी वनविभागाकडे वाघाला पकडण्याची मागणी केली आहे.









