तब्बल नऊ तास चक्का जाम आंदोलन
वाघाचा बंदोबस्त करण्याची तीव्र मागणी
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
गोंडपिपरी, 27 ऑक्टोबर :
तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात अवघ्या आठ दिवसात दोन गावकर्यांचा बळी घेतल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यांचा रोष कमालीचा वाढला असून, सोमवार, 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता चेकपीपरी, गणेशपिपरीसह तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थांनी चंद्रपूर-अहेरी या राष्ट्रीय महामार्गावर गोंडपिपरी जवळील धाबा टर्निंग पॉईंटवर तब्बल 9 तास रास्ता रोको आंदोलन केले.
तालुक्यातील गणेशपिपरी येथील अल्का पेंदोर (43) व पांडुरंग पेंदोर हे दाम्पत्य शेतात दिवसभर काम केल्यानंतर घराकडे जाण्याकरिता निघाले होते. मात्र, अल्का जनावरांसाठी चारा कापतो म्हणून तिथेच थांबली व पांडुरंग पुढे निघाले. तेवढ्यातच वाघाने हल्ला चढवून तिला फडफटत नेले. अल्का एक तासानंतरही घरी न परतल्याने पतीने गावकरी व वनविभागाच्या अधिकार्यांना घेऊन शोधमोहीम राबवली असता, शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात ठार झालेला तिचा मृतदेहच सापडला. आठवडाभरापूर्वी अवघ्या एका किलोमीटर अंतरावर असलेल्या चेकपिपरी येथे शेतकरी भाऊजी पाल यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सलग दोन हल्ल्यामुळे परिसरातील शेतकरी भयभित झाले असून, शेतात जाण्यास घाबरत आहेत.
घटनेची माहिती कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी गौरकर, क्षेत्र सहायक पुरी, पोलिस उपविभागीय अधिकारी सत्यजित आमले, ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. वाघाच्या शोधासाठी पिंजरे लावून विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे. दरम्यान, वाघाला जेरबंद करण्याची मागणी तीव्र झाली असून, नागरिकांनी वनविभागावर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. आंदोलनादरम्यान सर्व सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, पोलिस उपविभागीय अधिकारी सत्यजित आमले, गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी, सिसिएफ रामानुज, जिल्हा पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कुंदा जेणेकर, तहसीलदार शुभम बहाकर, सतीश वासमवार, माजी जि. प. सदस्य संदीप करपे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांना शांततेचे आवाहन केले व कुटुंबियांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
तालुक्यात वाढत्या वाघांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून, वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्या, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वाघाला पकडण्यासाठी चमू आल्यानंतर तब्बल 9 तासांनी ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेतले.









