₹१५.५ लाखांचे सुवर्णालंकार जप्त; मुख्य सूत्रधारावर हत्या, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-
आलिशान होंडा सिटी कारमधून उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये रेकी करून भर दिवसा बंद घरांचे लॉक तोडून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) यश आले आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार असलेल्या अट्टल गुन्हेगारासह तिघांना उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ₹१५ लाख ५० हजार किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, रायगड, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७४/२०२५ (दिनांक १५/०७/२०२५) अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ व ३३१(३) नुसार गुन्हा दाखल होता.
अशी होती गुन्ह्याची पद्धत
मागील काही महिन्यांपासून रायगड जिल्ह्यात, विशेषतः पाली, रोहा, महाड, श्रीवर्धन येथे, दिवसा घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. सर्व गुन्ह्यांमध्ये एक आलिशान होंडा सिटी कारचा वापर होत असल्याचे निष्पन्न झाले होते. ही टोळी उच्चभ्रू सोसायट्यांमधील बंद घरे हेरून, त्यांचे कुलूप तोडून मौल्यवान दागिने व रोकड लंपास करत होती. हे आरोपी रायगडसह शेजारील जिल्ह्यांतही अशाच चोऱ्या करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांना चकवा देत पळाले, पण…
स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके या टोळीचा तपास करत होती. दिनांक ०३/०८/२०२५ रोजी हीच संशयित होंडा सिटी कार माणगाव हद्दीत आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी लावली, मात्र आरोपींनी बॅरिकेट्स आणि आडव्या उभ्या केलेल्या वाहनांना चकवा देत भरधाव वेगाने पलायन केले.
जरी आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले, तरी तपासाला एक नवी दिशा मिळाली. तपासात असे निष्पन्न झाले की, ही टोळी एका जिल्ह्यात चोरी करून दुसऱ्या जिल्ह्यात वास्तव्य करत होती. उदा. साताऱ्यात चोरी केल्यावर रायगडमध्ये, रायगडमध्ये चोरी केल्यावर रत्नागिरीत आणि रत्नागिरीत चोरी केल्यावर पुन्हा साताऱ्यात ते मुक्काम ठोकत. या माहितीवरून पोलिसांनी तिन्ही जिल्ह्यांतील हायवे शेजारील हॉटेल्स आणि लॉज तपासले, जिथे एका हॉटेलमधून आरोपींबाबत प्राथमिक माहिती मिळाली.
उत्तर प्रदेशात महिनाभर ‘वेषांतर’
तांत्रिक विश्लेषणाद्वारे (पोहवा/७९९ अमोल हंबीर) आरोपी हे सिकंदराबाद, उत्तर प्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली. आरोपी आपसात संपर्क साधण्यासाठी अत्याधुनिक साधनांचा वापर करत होते.
यानंतर सपोनि भास्कर जाधव आणि सपोनि मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखालील दोन पथके तात्काळ सिकंदराबादला रवाना झाली. या पथकांनी सलग एक महिना आरोपींच्या परिसरात वेष पालटून (in disguise) रेकी केली आणि सविस्तर माहिती काढली.
मुख्य सूत्रधार निघाला ‘अट्टल’ गुन्हेगार
तपासात उघड झाले की, मुख्य आरोपी शाहनवाज कुरेशी हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी खुनाचे २, खुनाच्या प्रयत्नाचे ४, तसेच आर्म्स अॅक्टचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने यापूर्वी स्थानिक पोलिसांवर गोळीबारही केला होता.
अशी केली कारवाई
स्थानिक बातमीदार तयार करून, सीसीटीव्हीत दिसणारा मुख्य आरोपी शाहनवाज घरी आल्याची पक्की माहिती पथकाने मिळवली. आरोपीचा धोकादायक इतिहास पाहता, रायगड LCB ने स्थानिक पोलिसांची (५ अधिकारी व ४० अंमलदार) मदत घेतली आणि सुसज्ज शस्त्रांसह आरोपीच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत शाहनवाज इकराम कुरेशी (वय ५०) याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने इतर साथीदारांच्या मदतीने रायगड, रत्नागिरी (मंडणगड, रत्नागिरी शहर) आणि सातारा (वाई) जिल्ह्यांत घरफोड्या केल्याची कबुली दिली.
शाहनवाज इकराम कुरेशी (वय ५०, रा. सिकंदराबाद, जि. बुलंदशहर, उत्तर प्रदेश)
शमीम इस्लाम कुरेशी (वय ४२, रा. माणगाव, जि. रायगड, मूळ रा. बुलंदशहर, उत्तर प्रदेश)
हिना शाहनवाज कुरेशी (रा. सिकंदराबाद, जि. बुलंदशहर, उत्तर प्रदेश)
नौशाद इकराम कुरेशी (रा. सिकंदराबाद, उत्तर प्रदेश)
एहसान (रा. सिकंदराबाद, उत्तर प्रदेश)
रिकव्हरी टाळण्यासाठी करायचा आजारपणाचे नाटक
मुख्य सूत्रधार शाहनवाज हा अट्टल गुन्हेगार असून, अटक झाल्यावर तो आजारी असल्याचे नाटक करणे, स्वतःला दुखापत करून घेणे आणि पोलिसांवर खोटे आरोप करून मुद्देमाल जप्त (रिकव्हरी) करणे टाळत असे. जामिनावर सुटल्यावर तो सोशल मीडियावर (इन्स्टाग्राम, फेसबुक) याचा प्रचार करायचा आणि त्याचे समर्थक सिकंदराबादमध्ये मिरवणुका काढून सत्कार करायचे.
अगदी सिकंदराबादमधील स्थानिक पोलिसांनीही रायगड पोलिसांना “तो सराईत आहे, आजपर्यंत एका गुन्ह्याशिवाय त्याने कधीच रिकव्हरी दिली नाही, तुम्हालाही देणार नाही,” असे सांगून निराश केले होते. पोलीस कस्टडीत असताना त्याने तीन वेळा आजारपणाचे नाटक करून रुग्णालयात दाखल झाला होता. “महाराष्ट्रातील पोलीस आपलं काही वाकडं करू शकत नाहीत, मी आजारी असल्याचे नाटक केल्याने आपल्याला रिकव्हरी द्यायची गरज नाही,” असा निरोपही त्याने मॅजिस्ट्रेट कस्टडीमधून पत्नीला पाठवला होता.
कौशल्यपूर्ण तपासामुळे यश
अशा अट्टल गुन्हेगाराकडून रिकव्हरी करणे हे मोठे आव्हान होते. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि कौशल्यपूर्ण तपास करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आरोपीकडून ₹१५,५०,०००/- किमतीचे सुवर्णालंकार जप्त केले.
तसेच, आरोपींनी ०३/०८/२०२५ रोजी नाकाबंदीतून पळून जाताना पकडले जाण्याच्या भीतीने जंगलात लपवून ठेवलेल्या २४ जिवंत बुलेट्स (काडतुसे) देखील जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. मिलिंद खोपडे आणि कारवाई पथकातील सपोनि भास्कर जाधव, सपोनि मानसिंग पाटील, पोसई लिंगाप्पा सरगर यांच्यासह संपूर्ण टीमने (पोहवा/७९९ अमोल हंबीर, पोहवा/७९५ प्रतिक सावंत, पोहवा/८०० श्यामराव कराडे, पोहवा/७९४ रविंद्र मुंढे, पोहवा/२३४४ अक्षय पाटील, पोहवा/२३८८ सचिन वावेकर, पोहवा/१४७४ अक्षय जाधव, मपोहवा/८४ रेखा म्हात्रे, पोहवा/१५९६ सुदीप पहेलकर, पोशि/४५४ अक्षय जगताप, पोशि/२२३३ मोरेश्वर ओमले, पोशि/२२२६ लालासो वाघमोडे, पोशि/२०३० बाबासो पिंगळे, पोशि/६७८ ओंकार सोंडकर, पोशि/३६१ प्रशांत लोहार) यांनी केली आहे.
‘रायगड दृष्टी’ चॅटबॉटद्वारे नागरिक बनावट पोलीस
रायगड पोलिसांनी गुन्हेगारीविरुद्धच्या लढाईत नागरिकांना सक्षम करण्यासाठी ‘रायगड दृष्टी’ हा व्हॉट्सअॅप चॅटबॉट उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून नागरिक त्यांच्या परिसरातील मटका, जुगार, अवैध दारू, अंमली पदार्थ आणि इतर बेकायदेशीर कृत्यांबद्दल तक्रार नोंदवू शकतात. या सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व तक्रारी पूर्णपणे गुप्त ठेवल्या जातात, त्यामुळे नागरिकांना कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही.









