सूरत: विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया आज सकाळी कार अपघातातून थोडक्यात बचावले. सूरतच्या कामरेज परिसरात तोगडिया यांच्या कारला पाठीमागून आलेल्या एका ट्रकने जोरदार धडक मारली. मात्र तोगडिया यांनी कारमधून वेळीच उडी घेतल्याने ते बचावले.प्रवीण तोगडिया कारने बडोद्याला जात असताना सूरत येथे हा अपघात झाला. या अपघातात तोगडिया यांच्या बुलेटप्रुफ कारच्या काचा फुटल्या आहेत. मात्र कारमधून तात्काळ उडी घेतल्याने ते बचावले. तोगडियांना कोणतीही दुखापत झाली नसून कारमधील इतर लोकही सुखरूप असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, ‘आपल्याला जीवे मारण्याचा हा प्रयत्न होता, असा आरोप करतानाच बुलेटप्रुफ कार नसती तर कारमधील कोणीही जिवंत राहिले नसते,’ असा दावा तोगडिया यांनी केला. झेड प्लस सुरक्षा असतानाही पोलिसांनी पुरेशी सुरक्षा दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘माझ्या प्रवासाच्या मार्गाबद्दल पोलिसांना आधीच माहिती दिली होती,’ असं सांगतानाच माझ्या सुरक्षेत निष्काळजीपणा केल्याबद्दल राज्यसरकारकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here