मुंबई- सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही सेकंदाच्या व्हिडिओमुळे एका रात्रीत ‘स्टार’ झालेल्या प्रिया प्रकाशला तिच्या इंस्टाग्रामवरील एका पोस्टसाठी तब्बल ८ लाख रुपये मिळतात, अशी माहिती समोर आली आहे.
‘ओरू अडार लव’ मल्ल्याळी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या प्रिया प्रकाशचा या चित्रपटातील गाण्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओने सोशल मीडियात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या व्हिडिओत तिनं ज्या पद्धतीनं डोळा झाकला होता त्यावर लाखो जण घायाळ झाले होते. तेव्हापासून ती चर्चेत आहे. या व्हिडिओनंतर प्रिया प्रकाशच्या इंस्टाग्रामवर एका दिवसात ५० लाख फॉलोअर्स वाढले होते. प्रिया प्रकाश हिनं नुकतंच इंस्टाग्राम अकाउंटवरून ब्रँड्सचं प्रमोशन केलंय. यासाठी तिला एका पोस्टसाठी तब्बल ८ लाख रुपये मिळाले आहेत. अनेक मोठमोठे बँड्स जाहिरातीचा प्रस्ताव घेऊन तिच्याकडे जात आहेत. सोशल मीडियातून कमाई करणाऱ्या अनेक सेलिब्रेटीजलाही प्रिया प्रकाश हिनं मागं टाकलंय. प्रिया प्रकाशच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून तिच्या फॉलोअर्सची संख्या आता ५१ लाखांच्यापुढे गेली आहे. कमी वेळात फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झालेल्या स्टार्सच्या यादीत तिचा समावेश झाला आहे. ‘ओरू अडार लव्ह’ या मल्ल्याळी चित्रपटातून ती चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. प्रिया प्रकाशचा हा पहिलाच चित्रपट असून तो जून २०१८ रोजी प्रदर्शित होत आहे. आधी हा चित्रपट ३ मार्च २०१८ रोजी प्रदर्शित होणार होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here