पत्ता विचारणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीला संबंधित इमारतीत घेऊन आलेल्या एका मुलीला संबंधिताच्या वर्तनाविषयी शंका उपस्थित होताच, तिने थेट गच्चीवरून उडी मारल्याची घटना नालासोपारा पूर्व येथे घडली आहे. या १२वर्षीय मुलीच्या पायाला दुखापत झाली असून, जिवावरील धोका मात्र टळला आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
नालासोपारा पूर्वेकडील अलकापुरी भागातील ही घटना ३ एप्रिलची आहे. मुलगी याच परिसरात राहणारी असून, सातवी इयत्तेत शिकते. मंगळवारी दुपारी अज्ञात आरोपीने या मुलीला पत्ता विचारला व पत्ता दाखविण्यासाठी ही मुलगी त्या इमारतीत गेली. पण संबंधित व्यक्तीची वागणूक संशयास्पद वाटल्याने ती घाबरली. ही व्यक्ती आपल्याशी वाईट वागेल, या भीतीने तिने थेट गच्चीवरून खाली उडी मारली. हा प्रकार इमारतीखालील रहिवाशी पाहात होते. त्यांनी लागलीच एक कापड घेत मुलीला त्यावर झेलले. कापडावर पडल्याने ती बचावली, मात्र तरीही जखमी झाली. तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. तिच्यावर सध्या मुंबईतील नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मुलीचा जबाब घेण्यात आला असून, आजुबाजूच्या लोकांकडून मिळालेली माहिती तसेच सीसीटीव्ही फूटेज यावरून अज्ञात आरोपीचा शोध घेतला जात आहे.