मानवजातीच्या शाश्वत विकासासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक: उप शिक्षणाधिकारी अहाळे. राधादेवी बाकलीवाल विद्यालयात विद्यार्थी विज्ञान मेळावा उत्साहात साजरा

अजय उत्तम पडघान
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
मो:8554920002
*वाशिम, दि २९:-* अखिल मानवजातीच्या शाश्वत विकासासाठी प्रत्येकाच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माध्यमिक उप शिक्षणाधिकारी आकाश अहाळे यांनी केले. शिक्षण विभागाच्या वतीने स्थानिक श्रीमती राधादेवी बाकलीवाल विद्यालयात जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन आज ( दि.२९) रोजी करण्यात आले होते. या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी अहाळे बोलत होते.
राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व वाशीम माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रवींद्र कान्हेड हे होते, तर यावेळी उप शिक्षणाधिकारी आकाश अहाळे,वेतन पथक अधिक्षक बाळकृष्ण इंगोले, प्रभारी विज्ञान पर्यवेक्षक ललित भुरे, रामेश्वर झाडे, रामेश्वर अवचार, गणेश भाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात शाश्वत विकासासाठी मूलभूत विज्ञान आव्हाने व शक्यता या विषयावर जिल्हाभरातील विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण सादरीकरण केले. यावेळी परिक्षक म्हणून शिक्षका सौ. बोलवार, कु. दातार, शिक्षक उकंडे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ शिक्षक धनंजय वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन विनायक उज्जैनकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी रमेश तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच श्रीमती राधादेवी बाकलीवाल कन्या विद्या निकेतनचे शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.








