Home latest News पेऱ्याची मासेमारी अडकली प्लास्टीकच्या कचऱ्यात जाळ्यात प्लास्टीकचा कचराच-कचरा, बंदी काळातील मच्छीमारीवरही...

पेऱ्याची मासेमारी अडकली प्लास्टीकच्या कचऱ्यात जाळ्यात प्लास्टीकचा कचराच-कचरा, बंदी काळातील मच्छीमारीवरही संकट

69

पेऱ्याची मासेमारी अडकली प्लास्टीकच्या कचऱ्यात

जाळ्यात प्लास्टीकचा कचराच-कचरा, बंदी काळातील मच्छीमारीवरही संकट

पेऱ्याची मासेमारी अडकली प्लास्टीकच्या कचऱ्यात जाळ्यात प्लास्टीकचा कचराच-कचरा, बंदी काळातील मच्छीमारीवरही संकट

 

रत्नाकर पाटील
अलिबाग तालुका प्रतिनिधी
९४२०३२५९९३

अलिबाग -एक जूनपासून खोल समुद्रातील मच्छीमारी बंद झाल्याने आता मच्छीमार बांधवांना खाडी आणि समुद्र किनाऱ्यांवरील मच्छीमारीवर उदरनिर्वाह करावा लागत आहे. आधीच मच्छीचा दुष्काळ, मच्छीमारी बंदी आणि उरलीसुरली किनाऱ्यावरील पेऱ्याची मच्छीमारी प्लास्टीकच्या कचऱ्यात अडकली आहे. अतिशय कष्टाची पेऱ्याची मच्छीमारी करताना जाळ्यात प्लास्टीकचा कचराच कचरा येत असून जाळ्यात येणारे प्लास्टीक मच्छीमारांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

पावसाळ्याच्या दोन महिन्यात समुद्रातील मच्छीमारी बंद असते. 31 जुलैपर्यंत ही मच्छीमारी बंदी लागू असते. त्यामुळे जिल्ह्याच्या समुद्रात मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारी नाैका किनाऱ्यावर विसावल्या आहेत. या दोन महिन्यांच्या काळात मच्छीमारी नाैका व जाळ्यांची आदी कामे हाती घेतली जातात. समुद्रात मासेमारी बंद असल्याने समुद्र किनार्‍यावर ‘पेरा’ ही पारंपरिक मासेमारी केली जाते. पावसाळ्यात ही मासेमारी कोळी बांधवांचे उदरनिर्वाहाचे साधन असते. अलिबाग, मुरुड तालुक्यामध्ये पेरा मच्छीमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. समुद्रकिनारी उथळ समुद्रात हात पेर्‍याने 5 ते 6 जण जाळी घेऊन 100 फूट जाळीला दोन्ही बाजूला मजबूत काठी बांधून समुद्रात जाऊन ओढत जाळी किनार्‍यावर आणतात. भरती किंवा ओहोटी अशा दोन्ही वेळेला पेरा मासेमारी केली जाते.
यामध्ये खडकपालू, जिताडा, खेकडे,मादेली, चिमणी,बोईट, तांब, कोळंबी आदी मासळी मिळते. पेरा मासेमारी अतिशय़ कष्टाचे काम असून, ही मासेमारी 3 ते 4 तास केली जाते. यामध्ये तरुणांचा सहभाग अधिक असतो. यातून जी मासळी मिळते, ती बाजारात विक्री केली जाते. बंदी काळात मच्छीमारांचे हे आर्थिक उत्पन्नाचे एक प्रमुख साधन ठरते.
अलिबाग समुद्र किनारी पेऱ्याची मासेमारी करताना कोळी बांधव दिसून येतात. ही मासळी अत्यंत ताजी आणि चविष्ट असते; मात्र यामध्ये पापलेट, रावस, सुरमई यासारखी मोठी मासळी मिळत नाही. तर पेऱ्यात खडकपालू, जिताडा, खेकडे, माडेली,बोईट, तांब, कोळंबी आदी मासळी मिळते. समुद्र किनारपट्टीत पेऱ्यासह बोक्षी, घोलवा, पाग डोल टाइप आदी प्रकारे मासेमारी केली जाते. मच्छीमारी बंदी काळात उदरनिर्वाहासाठी अशा मासेमारीचा उपयोग होतो.

चाैकट-
पावसाळा सुरु झाल्याने आता समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असतो. मोठ मोठ्या लाटांमुळे समुद्रातील कचरा किनाऱ्यावर येतो. यात अनेक वेळा समुद्राच्या तळातील तेलयुक्त माती किनाऱ्यावर येते. तेलतवंगही किनाऱ्यावर दिसून येतो. याशिवाय प्लास्टीकची समस्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सध्या प्लास्टीकच्या बाटल्या, पिशव्या, काचेच्या बाटल्या किनाऱ्यावर येत आहेत. पेऱ्याची मासेमारी करताना हा प्लास्टीकचा कचरा जाळ्यात अडकून पडतो. मच्छीमारांना हा कचरा बाजूला करून मच्छी शोधावी लागते. अनेक वेळा जाळ्यात मच्छी कमी आणि प्लास्टीकचा कचराच जास्त असतो. सध्या जाळ्यात येणार कचरा हा आमच्यासाठी डोकेदुखी ठरत असल्याचे मच्छीमार बांधवांनी सांगितले.