दिवाळीचा आनंद हिरावला; बंद घर चोरट्यांनी फोडले
त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953
(नागपूर)(Nagpur)
बुटीबोरी : दिवाळीच्या
सणासुदीत कुटुंबाला सोबत घेऊन गावी गेलेल्या नागरिकांच्या घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. एमआयडीसीतील वीर सावरकरनगरात घरफोडीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे. ही घटना शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) दुपारी उघडकीस आली. दिवाळी उत्सवातील अशा घटनांमुळे नागरिकांत भीतीयुक्त वातावरण आहे.
शुभम उडान (२८) व त्यांची पत्नी रुचिका उडान (२६) हे वीर सावरकरनगर, प्लॉट क्रमांक १३२ येथे राहतात. शुभम हे एटिकॉर्न कंपनीत काम करतात तर रुचिका या शिक्षिका आहे. दिवाळी सणासाठी ते १६ ऑक्टोबरला गावी गेले होते. शुक्रवारला ते
दुपारी १२ वाजता परत आल्यावर त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. आत जाऊन बेडरूममध्ये बघितले असता कपाट अस्ताव्यस्त होते. सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू गायब होत्या. चोरट्यांनी चार सोन्याच्या अंगठ्या, पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, १२
ग्रॅम सोन्याचा गोफ, लहान मुलाचे चांदीचे कडे, दोन तोळे चांदीच्या तोरड्या, तीन ग्रॅमची सोन्याची नथ व मुलाने गोळा केलेली पाच हजारांची नगद, असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. रुचिका यांनी तत्काळ ११२ क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. बुटीबोरी पोलीस ठाण्यातील एपीआय नीलेश चौरे व हवालदार प्रशांत मांढरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यांनी पीडितांना घरातील इतर वस्तूंना हात लावू नये, अशी सूचना केली. मात्र, डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट तज्ज्ञ किंवा फॉरेन्सिक तपास पथक घटनास्थळी पोहोचले नव्हते. तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरी व घरफोडीच्या कलमांतर्गत गुन्हा (crime)दाखल केला आहे.









