Home latest News व्यसन हा एक मानसिक आजार आहे” – डॉ. अनिल डोंगरे

व्यसन हा एक मानसिक आजार आहे” – डॉ. अनिल डोंगरे

86

व्यसन हा एक मानसिक आजार आहे” – डॉ. अनिल डोंगरे

ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये
“अमली पदार्थ सेवन प्रतिबंध” विषयावर जनजागृती सेमिनार

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेज, अलिबाग येथे भारत सरकारच्या “अमली पदार्थ मुक्त भारत” जनजागृती अभियानांतर्गत “अमली पदार्थ मुक्त भारत” या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारचे आयोजन ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेज विधी सेवा समिती, जे.एस.एम. कॉलेज एन.एस.एस. विभाग आणि रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, जे.एस.एम. कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, उपप्राचार्य व एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ. नीलम हजारे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी आठवले यांनी केले, तर आभार प्रदर्शन आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. निलम म्हात्रे यांनी केले.
या कार्यक्रमात मनोविकारतज्ज्ञ डॉ. अनिल अनंत डोंगरे यांनी अमली पदार्थांचे शरीर व मनावर होणारे दुष्परिणाम याविषयी सखोल मार्गदर्शन केले. “व्यसन ही केवळ सवय नसून तो एक मानसिक आजार आहे” असे प्रतिपादन करत त्यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ—गुटखा, मशेरी, तपकीर, विडी, हुक्का—यांच्या सेवनामुळे दात, जीभ, घसा, फुफ्फुसे व आतड्यांचा कर्करोग होण्याचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे नमूद केले.
तंबाखूसोबतच मद्यपानामुळे अनेक भारतीय पुरुष गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जात असून “दारू पिल्याने झोप चांगली लागते व भूक सुधारते” हे समाजातील गैरसमज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मद्यपानामुळे यकृत, मेंदू व रक्तवाहिन्यांवर गंभीर परिणाम होतात, असे सांगत मित्रांचा आग्रह, तणाव, बेरोजगारी व peer pressure ही व्यसनाधीनतेची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.
भांग व गांजापासून तयार होणाऱ्या अमली पदार्थांचे सेवन तरुणांमध्ये वाढत असून गांजाच्या अतिसेवनामुळे मानसिक आजार उद्भवतात, अशी माहिती त्यांनी दिली. अफू, हेरॉईन, ब्राऊन शुगर, एम.डी. तसेच ई-सिगारेटच्या वाढत्या वापरामुळे तरुण-तरुणी व्यसनाधीन होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. व्यसनामुळे कौटुंबिक हिंसाचार, चोरी, बलात्कार व खून यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून त्यामुळे पोलीस व न्यायालयीन यंत्रणेवर ताण येतो, असेही त्यांनी नमूद केले. निरोगी व व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी सरकार व समाज यांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
LADCS चे प्रमुख ॲड. चंद्रशेखर कामथे यांनी बालकांचे लैंगिक शोषण या विषयावर मार्गदर्शन करताना पोक्सो कायद्यातील तरतुदींची सविस्तर माहिती दिली. तसेच स्त्रियांच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळासंदर्भात पॉश कायद्यातील तरतुदी आणि अमली पदार्थविरोधी एन.डी.पी.एस. कायद्यातील उपलब्ध उपाययोजना याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास प्रा. डॉ. संदीप घाडगे, प्रा. प्रेम आचार्य, प्रा. पंकज घरत, प्रा. चिन्मय राणे, विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य, दोन्ही महाविद्यालयांचे प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.