Home latest News शिवतीर्थावरील सत्तेसाठी मोर्चेबांधणी सुरू

शिवतीर्थावरील सत्तेसाठी मोर्चेबांधणी सुरू

151

शिवतीर्थावरील सत्तेसाठी मोर्चेबांधणी सुरू

जिल्हा परिषदेच्या ५९ पदांसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास होणार सुरुवात

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केल्या. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरु झाली आहे. जिल्हयातील परिषदेच्या ५९ तर पंचायत समितीच्या ११८ पदांसाठी निवडणूक होत असून जिल्हयातील सर्वच राजकीय पक्षांनी शिवतीर्थावर सत्ता मिळविण्यासाठी अखेरची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार असून ५फेब्रुवारी रोजी मतदान होणार यावेळी निवडणूक प्रचाराला फक्त सात दिवस मिळणार आहेत.
गेले अनेक दिवस राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांना ज्यांची प्रतिक्षा लागून राहिली होती त्या जिल्हा परीषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका अखेर जाहीर झाल्या. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना हायसे वाटले. निवडणूक आयोगाने तारखा घोषित केल्यामुळे रायगड जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दुसरीकडे प्रशासनाने देखील निवडणूकांची तयारी जवळपास पूर्ण केली असून प्रशासकीय पातळीवरील हालचाली देखील वाढल्या आहेत.
जिल्हा परीषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सातत्याने वेगवेगळया कारणांनी पुढे ढकलल्या जात होत्या. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधुक वाढत होती. निवडणूकीसाठी केलेली मेहनत वाया जाते की काय अशी त्यांना भीती होती. आज निवडणूक आयोगाने निवडणूका जाहीर केल्या.
निवडणूका जवळ आल्याने राजकीय पक्ष गेले काही दिवस जोरदार कामाला लागले होता. मतदार संघवार आढावा बैठका घेवून कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जात होती. इच्छुक उमेदवारांच्या ताकदीची चाचपणी केली जात होती. कुणाला उमेदवारी दिली तर विजयाची शक्यता अधिक आहे याचाही अंदाज घेतला जात होता. हे सर्व अंतिम टप्प्यात असताना निवडणुकांची घोषणा झाली आहे.
निवडणूकांची घोषणा होताच जिल्हयात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव सुरू आहे. जिलहयातील प्रमुख नेते सध्या महापालिका निवडणूकांच्या प्रचारासाठी महानगरात आहेत. पुढील दोन दिवसात ते जिल्हयात दाखल होतील आणि त्यानंतर खरया घडामोडी सुरू होतील. जिलहयात महायुती विरूदध महाविकास आघाडी अशी लढत दिसत असली तरी पुढील चार पाच दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे.
रायगड जिल्हा परिषद व जिल्ह्यातील १५पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ५फेब्रुवारी रोजी मतदान तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात १७ लाख ३८१ मतदार असून, जिल्ह्यातील २ हजार ३२३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
एकीकडे राजकीय आघाडीवर धावपळ सुरू झाली असतानाच निवडणुकांसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. आरक्षण, मतदान यादी, मतदार केंद्र निश्चित झाले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये १७ लाख ३८१ मतदार आहेत. त्यात ८ लाख ५७ हजार ९ महिला आणि ८ लाख ४६ हजार ३४७ पुरुष तसेच इतर २५ मतदारांचा समावेश आहे.

अध्यक्षपदासाठी चुरस
तीन वर्षाच्या प्रदिर्घ प्रशासकीय राजवटीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नेहमीच वादात राहिलेले आहे. जिल्ह्यातील मात्तब्बर राजकीय कुटुंबाचे या पदावर सातत्याने वर्चस्व राहिलेले असताना निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या अध्यक्षपदाच्या आरक्षणातून  रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण (खुल्या) गटासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या सर्वच नेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून यामुळे अध्यक्षपदाची चुरस अधिकच वाढण्याची शक्यता आहे.

तालुके      मतदार संख्या   मतदान केंद्र
पनवेल       २७९७७६        ३४६
कर्जत        १७०७०२         २२०
खालापूर     ११०९८२          १४४
सुधागड      ५३९९८           ७५
पेण            १३९४७९         १९०
उरण         १०८५२०          १३५
अलिबाग    २०१९२३           २६१
मुरुड        ५५५५२            ८१
रोहा          १२८७६३          १९४
तळा         ३२१२२             ५२
माणगाव    १३९५१९           २०६
म्हसळा     ४३५३१             ६९
श्रीवर्धन     ५६८२६            ८०
महाड       १३९४४६           २०३
पोलादपुर  ३९२४२             ६७
एकूण       १७००३८१         २३२३