पनवेल : लोकशाहीर काॅम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या आणि कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या काॅम्रेड शांताबाई साठे यांचे कांदिवली येथील खासगी रुग्णालयात प्रदिर्घ आजारामुळे निधन झाले आहे. त्या नव्वद वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपणारा एक महत्वाचा दुवा निखळला असल्याची भावना सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. शांताबाई अविवाहित होत्या. त्यांच्या पश्चात धाकटी बहीण शकुंतला, भाचे, भाची आणि नातवंडे असा परिवार आहे.
शांताबाई या अण्णाभाऊ साठे यांच्या पत्नी काॅम्रेड जयवंताबाई यांच्या कन्या होत्या. लहानपणापासूनच त्यांच्यावर डाव्या विचारसरणीचे संस्कार झाले होते. बालवयातच त्यांनी बाल संघ आणि तत्कालीन लाल बावटा कला पथकात सक्रिय सहभाग घेतला होता. सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले. त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले होते.
सन १९४९ च्या काळात कम्युनिस्ट पक्षावर मोठ्या प्रमाणावर दडपशाही सुरु असताना शांताबाई यांनाही याचा फटका बसला होता. त्याकाळात त्यांनी काही महिने तुरुंगवास भोगला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण असल्याने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी औषध निर्मिती कंपनीत नोकरी स्वीकारली. नोकरी करत असतानाच त्या कामगार संघटनांच्या कामातही सक्रिय राहिल्या. कामगार चळवळ आणि सामाजिक बांधिलकी यामध्ये त्यांनी आयुष्यभर सातत्य राखले.
शांताबाईंच्या स्वभावात माणुसकी आणि कुटुंबाविषयीचा जिव्हाळा विशेष होता. स्वतःच्या मर्यादित पगारातून त्या दर महिन्याला वाटेगाव येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पहिल्या पत्नी कोंडाबाईंना आर्थिक मदत पाठवत असत. अण्णाभाऊंच्या पहिल्या कुटुंबाशी, विशेषत: मुलगा मधुकर याच्याशी त्यांचे अत्यंत आत्मीय संबंध होते. आर्थिक अडचणी असूनही त्यांनी कधीही कुटुंबापासून किंवा सामाजिक जबाबदारी यापासून स्वतःला दूर ठेवले नाही.
साहित्य आणि रंगभूमीशीही शांताबाईचे अतूट नाते होते. अण्णा भाऊ साठे यांच्या कथा, कादंबऱ्या आणि लोकनाट्याच्या त्या पहिल्या वाचक मानल्या जात होत्या. शाहीर अमर शेख आणि दत्ता गव्हाणकर यांच्या कला पथकात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. सत्तरच्या दशकात ‘काय चाललंय गं’ या लोकनाट्यात त्यांनी अभिनय केला होता. तसेच १९८६ मध्ये ‘लोकमंच’ संस्थेच्या गाजलेल्या ‘अकलेची गोष्ट’ या लोकनाट्यात त्यांनी अभिनयासह सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिले होते.









