रायगड जिल्ह्यामध्ये धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता पाणीटंचाईच्या झळा सोसेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 80 हजार 91 नागरिक पाण्याच्या प्रतीक्षेत असून, 226 ठिकाणी पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला आहे. त्यात 42 गावे आणि 184 वाड्यांचा समावेश असून, या गावांना 50 खासगी टँकर्समार्फत पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. अलिबागसह दहा तालुक्यांना पाण्याचा दुष्काळ जाणवत आहे. त्यामध्ये पनवेल, पेण, महाड व अलिबाग या तालुक्यांत सर्वात जास्त पाणीटंचाईच्या झळा जाणवत असल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु झाला आहे. धार्मिक कार्यक्रमांसह उत्सव व लग्नसोहळे अनेक गावे, वाड्यांमध्ये सुरू आहेत. उन्हाळी सुट्टी पडल्याने मुंबई, पुणे, बोरीवली, ठाणे येथील चाकरमानीदेखील गावी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आले आहेत. मात्र गावे, वाड्यांमध्ये पाणी नसल्याने स्थानिकांसह चाकरमान्यांकडून प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पाण्यासाठी अनेक गावांतील नागरिकांना दोन ते तीन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यात लघुपाट बंधारे विभागांतर्गत येणाऱ्या 28 धरणांमध्ये फक्त 29 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.
सुधागडमधील ढोकशेत धरणामध्ये पाण्याचा थेंबही नाही. उन्हेरे, पुनाडे, घोटवडे, कवेळे, पाभरे, रानीवली या धरणांमध्ये चार ते 15 टक्क्यांपर्यंत जलसाठा आहे. श्रीगाव, फणसाड, कुडकी, कार्ले, वरंध, कोथुर्डे, साळोख, अवसरे, मोरबे, बामणोली, कलोते मोकाशी, फणसाड, खैरे या धरणामध्ये 22 ते 40 टक्के, भिलवले, डोणवत, संदेरी, खिंडवाडी या धरणांमध्ये 41 ते 49 टक्के आणि सुतारवाडी, आंबेघर, वावा या धरणांमध्ये 54 ते 66 टक्के जलसाठा शिल्लक आहे. सध्या या सर्व धरणांमधील जलसाठा कमी होऊ लागला आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील नागरिकांवर होत आहे. जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात 412 टँकर्समार्फत 192 ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात आला होता. आता 59 हजार नागरिकांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा निर्माण झाल्याने टँकर्समध्ये वाढ करण्यात आली आहे. 50 टँकर्समार्फत 42 गावे व 184 वाड्या अशा एकूण 226 ठिकाणी पाणीपुरवठा केला जात आहे. तरी अद्याप 80 हजार नागरिकांना पाण्याच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे. हा आकडा वाढल्यास जिल्ह्यात आगामी काळात भीषण टंचाई जाणवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड
जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ नागरिकांवर आली वआहे. काही धरणांच्या परिसरात पाणी शुद्धीकरण केंद्र नाहीत. परिणामी, मातीमिश्रित पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. त्यामुळे अनेकांनी शुद्ध पाण्यासाठी विकतचे पाणी आणण्यावर भर दिला आहे. मात्र, शुद्ध पाण्याचा बाटला 50 रुपयांनी विकत घ्यावा लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे, अशी प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.
तालुके बाधित लोकसंख्या गावे, वाड्या टँकर
अलिबाग 8782 04 03
उरण 1351 04 01
पनवेल 14,24809 08
कर्जत 5494 11 06
खालापूर 6588 13 06
पेण 19,12969 12
माणगाव 5352 19 05
महाड 16,12083 07
पोलादपूर 1401 1001
श्रीवर्धन 1626 04 01
एकूण 80,09122650
अँड. रत्नाकर पाटील
अलिबाग









