गोंदिया, दि. 11 : संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या विचारांतून समाजाला समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला असून, आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षण आणि संस्कारांच्या माध्यमातून जीवन समृद्ध करावे, असे प्रतिपादन निरूपणकार व व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले.
सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित ‘मोगरा फुलला’ या सांगीतिक कार्यक्रमात ते बोलत होते. सांस्कृतिक कार्यमंत्री मा. आशीष शेलार यांच्या पुढाकारातून ‘मोगरा फुलला’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत आयोजित करण्यात येत असून, रसिकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या कार्यक्रमास श्री विजय अवधाने (उपजिल्हाधिकारी), श्री दिलजीतसिंग खालसा, श्री जयंतजी शुक्ला, श्री संजीव बापट विदर्भ साहित्य संघ, श्री प्रकाश उमाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्यावर अभ्यासपूर्ण भाष्य केले. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या माध्यमातून सामान्य जनतेसाठी अध्यात्माचे दरवाजे खुले केले आणि मातृभाषेतून ज्ञान देण्याची परंपरा निर्माण केली, असे त्यांनी सांगितले.
आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण हे केवळ रोजगाराचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले. “आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी, समाजात सन्मानाचे स्थान मिळवण्यासाठी आणि जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी शिक्षणाची कास धरणे आवश्यक आहे,” असेही ते म्हणाले.
युवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी मोबाईल आणि सामाजिक माध्यमांचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले. वेळेचे नियोजन, सातत्यपूर्ण अध्ययन, चांगल्या पुस्तकांचे वाचन आणि संत साहित्याचा अभ्यास यामुळे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते, असे त्यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी जाती-पातीच्या भिंती ओलांडून सर्वसमावेशकतेचा संदेश दिला असून, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत मूल्याधिष्ठित शिक्षणाची जोड आवश्यक असल्याचा विचारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमात गायिका सौ. संमिता शिंदे यांनी अभंग, भारुडे आणि गवळणी सादर करून वातावरण भक्तिमय केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोंदिया प्रतिनिधी









