जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे इंजिनीयर होण्याचे स्वप्न होणार साकार…
संजय चन्ने, गोंदिया: गोंदिया जिल्हा हा उच्च शिक्षणासाठी मागासलेला म्हणून राज्यात ओळखला जातो. पण कासव गतीने का होईना? हळूहळू उच्च शिक्षणासाठी दालन उघडत आहे.
कर्तव्यदक्ष आमदार म्हणून विनोद अग्रवाल यांनी सततचा पाठपुरावा करून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे इंजिनीयर बनण्याचे स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नाला यश मिळवले आहे.
मागील काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील एकमेव अभियांत्रिकी विद्यालय म्हणून एमआयटी बंद झाल्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना इंजिनीयर बनणे तारेवरची कसरत झाली होती.
अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थी आर्थिक भुर्दंड सोसून बाहेर जिल्ह्यात जात असत.
याची गंभीर दखल घेत कर्तव्यदक्ष व सक्रिय आमदार म्हणून ओळखले जाणारे विनोद अग्रवाल यांनी सततचा पाठपुरावा करून गोंदिया येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मार्ग अखेर मोकळा केला. अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे सादर झाला असून मंजुरीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी पत्र क्रमांक 2/ एनजीसी /शा. अभी. महा /गोंदिया /2026 दिनांक 6 मार्च 2026 द्वारे हा प्रस्ताव मुख्य सचिव तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे पाठविला आहे अशी माहिती आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील अभियांत्रिकी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच शिक्षण पूर्ण करता येईल व सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशन,कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
शैक्षणिक दृष्ट्या उच्चशिक्षणासाठी मागासलेला समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याला हे यश महत्त्वाचे आहे.
आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांनाही आता जिल्ह्यातच अभियांत्रिकी शिक्षण घेऊन इंजिनियर बनण्याचे स्वप्न पूर्ण करता येतील याशिवाय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय होत असल्याने जिल्ह्यात शैक्षणिक क्रांतीची कासव गतीने का होईना पुढे वाटचाल होत असल्याचे आनंददायी वातावरण तयार होत आहे.
फक्त विधानसभा क्षेत्राच्या विकासापुरता विचार न करता संपूर्ण जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाच्या ध्यास असणारे आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नामुळे पुनश्च त्यांच्या लोकप्रियतेत निश्चितच वाढ होत आहे.









