Home latest News मांगरूळ बौद्धवाडीत वृक्षारोपणासह संविधान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

मांगरूळ बौद्धवाडीत वृक्षारोपणासह संविधान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

34

पर्यावरण संवर्धन, शिवराज्याभिषेक दिन आणि संविधान जागृतीचा त्रिवेणी संगम

राम सिताराम भोस्तेकर | माणगाव

माणगाव तालुक्यातील मांगरूळ बौद्धजन सेवा संघाच्या वतीने पर्यावरण संवर्धन, शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व आणि भारतीय संविधान जनजागृतीचा संदेश देणारा विशेष उपक्रम मांगरूळ बौद्धवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. वृक्षारोपण, संविधान जागृती आणि शिवराज्याभिषेक दिनाचे स्मरण अशा तिहेरी उद्दिष्टांचा संगम साधणाऱ्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मांगरूळ बौद्धजन सेवा संघाच्या पुढाकारातून सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाची सुरुवात पंचशील वंदनेने झाली. राजरत्न लोखंडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर आयोजित संविधान जनजागृती सत्रात भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.

संविधान अभ्यासक नुरखॉं पठाण यांनी संविधानाचे सामाजिक परिवर्तनातील महत्त्व अधोरेखित केले. संविधानाची तत्त्वे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता व्यक्त करताना त्यांनी जनजागृती मोहिमांचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व, स्वराज्य स्थापनेमागील दूरदृष्टी आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला.

पर्यावरण संरक्षणाच्या विषयावर बोलताना नुरखॉं पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा निसर्ग संवर्धनाकडे असलेला दूरदर्शी दृष्टिकोन स्पष्ट केला. पाचाड येथील राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळाजवळील आज्ञापत्राचा संदर्भ देत पर्यावरण रक्षणाची प्रेरणा उपस्थितांना दिली.

संविधान जनजागृती अधिक प्रभावी करण्यासाठी संविधान प्रश्नमंजुषा, पाक्षिक संविधान बैठक तसेच विविध प्रबोधनात्मक उपक्रमांचे नियोजन यावेळी करण्यात आले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वराज्याला प्राप्त झालेले वैभव, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचा संदेशही उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आला.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला. ग्रामस्थ, रमाई महिला मंडळ तसेच मुंबई मंडळातील सदस्यांनी वृक्षसंवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदविला. पर्यावरण संरक्षण, संविधान जागृती आणि इतिहास संवर्धन या तिन्ही उद्दिष्टांचा संगम साधणारा हा उपक्रम उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यशस्वी ठरला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रमणी साळवी होते. निखिल लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले तर महेंद्र लोखंडे यांनी आभार प्रदर्शन केले.

यावेळी शाखा क्रमांक ८४१/३ चे सचिव विजय जाधव, आरिफभाई करबेलकर, तेजराज गोंडने, अजय वानखडे, मांगरूळ बौद्धजन सेवा संघ मुंबईचे अध्यक्ष प्रमोद लोखंडे, उपाध्यक्ष संदेश लोखंडे, कोषाध्यक्ष विपुल लोखंडे यांच्यासह तुकाराम लोखंडे, सुरेंद्र लोखंडे, श्रीकांत लोखंडे, सिद्धार्थ के. लोखंडे, मनोज लोखंडे, संतोष लोखंडे, प्रवीण लोखंडे, संजय लोखंडे, प्रभाकर लोखंडे, अनंत लोखंडे, पांडुरंग लोखंडे, राजन लोखंडे, राहुल लोखंडे, संजय गेणू लोखंडे, प्रकाश लोखंडे, रविंद्र लोखंडे, विनोद लोखंडे, सुनील लोखंडे, अपर्णा लोखंडे तसेच नवतरुण संघाचे विशाल लोखंडे, प्रफुल लोखंडे, रत्नदीप लोखंडे, पंकेश लोखंडे, नितेश लोखंडे, राजेश लोखंडे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मांगरूळ बौद्धजन सेवा संघाच्या वतीने आयोजित वृक्षारोपण व संविधान जनजागृती कार्यक्रमात सहभागी झालेले पदाधिकारी, महिला मंडळ सदस्य व ग्रामस्थ.