रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत क्रिकेटच्या प्रगतीचा संकल्प
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि.३० ऑक्टोबर रोजी पेण येथील शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.येणाऱ्या क्रिकेट हंगामासाठी रायगड जिल्ह्यातील विविध वयोगटातील मुला- मुलींच्या खेळाडूंच्या सर्वांगीण प्रगतीकडे जिल्हा क्रिकेट असोसिएशन लक्ष देऊन अधिकाधिक प्रयत्न करून सर्वांच्या साथीने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
नवीन कार्यकारणी कमिटी स्थापन झाल्या पासून जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सर्व वयोगटाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून गतवर्षी आरडीसीएच्या वतीने जवळपास ३७५ सामन्यांचे आयोजन यशस्वी रित्या करण्यात आल्याची माहिती उपस्थिती सभासदांना देण्यात आली.तसेच गेल्या क्रिकेट हंगामात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरजिल्हा निवड चाचणी स्पर्धेतील १५ दोन दिवसीय सामन्यांचे आयोजन देखील जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्रदीप नाईक यांनी मागील इतिवृत्त वाचून त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आर्थिक दृष्ट्या सक्षम होत असल्याचे सचिव प्रदीप नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले,आरडीसीएच्या मार्फत सर्व व्यवहार कॅशलेस केला जात असल्याने सर्व कारभार हा पारदर्शक पद्धतीने केला जात असल्याचे नाईक यांनी सभेपुढे बोलतांना सांगितले.गतवर्षी रायगड जिल्ह्यातील सुमारे १३ एमसीए पंच व १५ एमसीए स्कोअरर उत्तीर्ण झाले असून काही दिवसांपूर्वी रायगडच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला पंच म्हणून साची बेलोसे हिने बहुमान मिळवला असल्याने सर्वांनी तिचे अभिनंदन केले आहे.
रायगड जिल्ह्यातील अत्याधिक प्रशिक्षित पंच व स्कोअरर तयार व्हावेत ह्यासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशन प्रयत्नशील आहे.जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी सभेला मार्गदर्शन करतांना सांगितले की रायगड जिल्ह्यात क्रिकेटच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांची साथ मिळणे गरजेचे आहे,प्रत्येक पदाधिकारी,सदस्य,सभासद,संघाचे प्रतिनिधी,प्रशिक्षक,पंच,स्कोअरर,खेळाडू त्यांचे पालक यांनी आपले योगदान दिले तर जिल्ह्यात क्रिकेट खेळाची प्रगती अत्याधिक होईल.जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडे स्वतःच्या हक्काचे मैदान मिळावे म्हणून आरडीसीए प्रयत्नशील आहे आपण मैदानाच्या जागेचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर केला असून जागा उपलब्ध झाल्यास महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडून मोठी आर्थिक मदत केली जाणार असल्याचे अनिरुद्ध पाटील यांनी यावेळी सांगितले. उपस्थित सभासदांनी क्रिकेटच्या विविध कार्यक्रम प्रक्रिये संदर्भात अनेक सूचना मांडल्या असून जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने येणाऱ्या प्रत्येक सूचनांकडे लक्ष देऊन वेळोवेळी योग्य बदल केलं जातील असे मत आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी व्यक्त केलं आहे.वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आरडीसीएचे पदाधिकारी,सदस्य,आजीवन सदस्य, जिल्ह्यातील विविध अकॅडमी,क्लब संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.









