Home latest News गंगाझरीजवळ कार–दुचाकीची भीषण धडक; दोन जण गंभीर जखमी

गंगाझरीजवळ कार–दुचाकीची भीषण धडक; दोन जण गंभीर जखमी

26

माजी पंचायत समिती सभापती मनोज भाऊ बापचे यांनी रुग्णालयात धाव घेत केली मदत

गोंदिया: जिल्ह्यातील गंगाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत मंगेझरी चौकीजवळ गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 31 एफआर 1362 क्रमांकाची कार तिरोडा येथून गोरेगावकडे जात होती. दरम्यान, समोरून येणाऱ्या दुचाकीशी कारची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. या अपघातात चक्रधर मूलचंद कावडे व अश्विनी कावडे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी गोंदिया जिल्हा रुग्णालयात रेफर केले.

घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती मनोज भाऊ बापचे यांनी तात्काळ रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांकडून उपचाराची माहिती घेत आवश्यक मदत व मार्गदर्शन केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत डोंगरे, विनोद पारधी तसेच गुड्डू कावडे हेही उपस्थित होते. त्यांनीही सामाजिक बांधिलकी जपत जखमींना मदतकार्य केले.

अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेचा पुढील तपास गंगाझरी पोलीस करीत आहेत.