महायुती सरकारचा मोठा निर्णय, तर समाजवादी पक्षाचा विरोध
अरुणकुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
मो: 7715918136
पनवेल : महायुती सरकारने महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘ वंदे मातरम् ‘ हे गीत पुर्ण स्वरुपात गाण्यासाठी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. कालकथित बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या ‘ वंदे मातरम् ‘ह्या गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त हा आदेश शासनाने जारी केला आहे. आतापर्यंत शासकीय आदेशानुसार शाळांमध्ये ‘ वंदे मातरम् ‘ ह्या गाण्याचे फक्त पहिले दोनच श्लोक गायले जायचे.
पण आता’ वंदे मातरम् ‘ ह्या गीताच्या 150 व्या वर्षपुर्तीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राजमाता जिजाबाई ट्रस्टने शिक्षण विभागाला पत्र देऊन निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव अ रा कुलकर्णी यांनी शिक्षण आयुक्तांना यासंदर्भातील उपक्रम शाळांमध्ये राबविण्याच्या सुचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.
देशाचे राष्ट्रीय गीत ‘ वंदे मातरम् ‘ च्या निर्मितीला दि .31 ऑक्टोबर 2025 रोजी 150 वर्षं पूर्ण झाले असुन त्यानिमित्ताने 31 आॅक्टोबर ते 7 नोव्हेंबर ह्या दरम्यान महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘ वंदे मातरम् ‘ ह्या गीताच्या सगळ्या कडव्यांचे गायन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आजच्या पिढीला गीताचा अर्थ , इतिहास आणि राष्ट्रीय अस्मिता समजणे तितकेच आवश्यक आहे. म्हणुनच राष्ट्रगीतापासुन राष्ट्र संरक्षणापर्यंत सर्वांगिण मुल्य शिक्षण देण्यासाठी सदर निर्णय अंमलात आणला असल्याचे सांगितले आहे..
राज्य मंडळाच्या शाळांची दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर 3 नोव्हेंबर पासून शाळा सुरू होणार आहेत. तथापि , सीबीएसई, आयसीईएसई अशा अन्य मंडळाच्या संलग्न शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच शाळांमध्ये उपक्रम सुरु करण्यात येणार आहेत. दरम्यान, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी सरकारच्या ह्या निर्णयाला कडाडून जोरदार विरोध केला आहे. तर दुसरीकडे, भाजपने ह्या दोन्ही आमदारांवर हल्लाबोल केला असुन , त्यांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला आहे. ह्या संपुर्ण घटनाक्रमामुळे आता राज्यात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही .









