अरुणाचल प्रदेश – अरुणाचल प्रदेशात भारताविरोधात चीनने नवी खेळी केली आहे. डोकलामची डोकेदुखी मिटल्यानंतर चीनने भारताच्या संपर्क यंत्रणेलाच आव्हान दिले आहे. अरुणाचल प्रदेशात किबिथु आणि काहो भागात गेल्यानंतर भारतीयांच्या मोबाइलवर ‘वेलकम टू चायना’ असा संदेश येतोय. तसंच भारतीय कंपन्यांचे एकही मोबाइल नेटवर्क या भागात मिळत नाहीए.
किबिथु आणि काहोमध्ये भारतीयांच्या मोबाइलवर चिनी मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क दाखवत आहे. शिवाय चिनी भाषा मँडरीनमध्ये सगळे संदेश येत आहेत. घड्याळातील वेळही अडीच तास पुढची दिसतेय.’किबिथु आणि काहो भागात रस्त्याद्वारे किंवा मोबाइलने संपर्कच होत नाहीए. यामुळे अडचणीत भर पडली आहे. एवढचं नव्हे तर जखमी जवानांना इथून घेऊन जाणंही आव्हानच आहे. कारण किबिथुला जोडणाऱ्या एकमेव रस्त्यावर कायम भूस्खलन होत असतं’, असं भारताच्या एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं.









