नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा घोळ कायम, दिबां ‘ च्या नामकरणाची याचिका फेटाळली
अरुणकुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
मो: 7715918136
पनवेल:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील असे नामकरण करण्याचा निर्णय तात्काळ घेण्यासाठी केंद्र व केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला हायकोर्टाने आदेश द्यावेत. अशी मागणी करणारी जनहित याचिका नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. विमानतळाच्या नावावरुन मुंबई तसेच नवी मुंबईत अशांतता निर्माण होऊ नये म्हणून आदरणीय लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळाला तात्काळ देण्यात यावे. अशी मागणी करणारी जनहित याचिका प्रकाशज्योत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.
मात्र कोणत्याही सार्वजनिक प्रकल्पाचे नामकरण करणे तसेच नांव बदलणे आदी निर्णय हे प्रशासकीय पातळीवर घेतले जात असतात. त्याच अनुषंगाने आम्ही कोणालाही नांव देण्यासाठी अथवा नांव बदलण्यासाठी आदेश देऊ शकत नाही. अशा प्रकारे प्रशासकीय निर्णयात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही.असे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावताना स्पष्ट केले.
नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार आहे. सदर नामकरणाच्या प्रस्तावास पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती 3 आॅक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही 2022 मध्ये दि. बां. चेच नाव विमानतळाला देण्याचे घोषित केले होते. काही दिवसांनंतर ‘ लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘ असा नामविस्तार होईल. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. असे असुनही मुंबई उच्च न्यायालयाने ह्या सबबीच्या आधारे नामकरणाच्या मागणीसाठी याचिका करता येऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या संबंधित नियम व वैधानिक तरतुदीनुसार निर्णय घेण्यास शासनाचे अधिकारी सक्षम आहेत. सदर विमानतळाच्या नामकरणाच्या प्रस्तावावर कायद्यानुसार निर्णय घेण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने कोणत्या कायद्याच्या अधिकारांतर्गत सदर मागणी केली होती. हे सिद्ध करण्यास याचिकाकर्ते अपयशी ठरल्याचे अधोरेखित करुन मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाची याचिका फेटाळून लावली आहे.









