सामाजिक चळवळीचे प्रणेते डॉ.बाबा आढाव यांचे वृद्धापकाळाने निधन
अरुणकुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
मो.क्र. 7715918136
पनवेल : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, श्रमिकांच्या चळवळीचे प्रणेते, डॉ. बाबा आढाव यांचे काल रात्री १० वाजता पुणे येथील रुग्णालयामध्ये वृध्दापकाळात अल्प आजाराने निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ९५ वर्ष होते. डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मागील दहा दिवसांपासून डॉ. आढाव यांच्यावर हृदयरोग तज्ञ डॉ. अभिजित वैद्य व तज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती म्हणून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.
बाबा आढाव हे पुण्यात १९३६ मध्ये जन्मले होते, पाच भावंडांमध्ये ते सर्वात धाकटे होते.त्यांच्या आईचे लवकरच निधन झाले होते तेव्हा ते आजोळात वाढले. त्यांनी विज्ञान शाखेत बी .एस्सी.पदवीपर्यत शिक्षण घेतले त्यानंतर आयुर्वेदात पदवीधर म्हणून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण केले. १९५३ मध्ये घरातच दवाखाना सुरू करून त्यांनी गोरगरीब रुग्णांची मोफत सेवा शुश्रुषा केली.ही अशी सुरुवातच त्यांच्या शोषितांविषयीची संवेदनशीलता दर्शवते. त्यांच्या निधनाने श्रमिक चळवळीचे तसेच फुले , शाहू , आंबेडकर विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्या पुरोगामी चळवळीचे हे अपार व अपुरणीय नुकसान आहे.श्रमिक चळवळीचे खरे आधारस्तंभ म्हणून त्यांनी लाखो कष्टकऱ्यांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर अढळ लढा दिला. महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचे ते कृतिशील वाहक होते. अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहण्याची प्रेरणा त्यांच्या जीवन कार्याने अनेकांना दिली.
८० च्या दशकात जातीय भेदभावाला छेद देण्यासाठी “ एक गाव – एक पाणवठा ” या चळवळीने त्यांनी सामाजिक न्यायाचा नवा अध्याय लिहिला. शोषित, पीडित, वंचित समाज घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.त्यांच्या निधनाने असंघटित क्षेत्रातील कामगारांचा खरा साथी, मार्गदर्शक आणि लढवय्या नेतृत्व हरपले आहे. कामगार स्वाभिमानाच्या लढ्यातील त्यांचे योगदान इतिहासात सदैव प्रेरणादायी राहील. डॉ. बाबा आढाव म्हणजे एक गाव एक पाणवठा, बाबा म्हणजे परित्यक्ता स्त्रियांचा मुक्तीदाता, बाबा म्हणजे हमाल मापाड्यांचा कैवारी, बाबा म्हणजे काच पत्रा वेचणा-या हातांच्या जखमांवर उपचार करणारा डॉक्टर, बाबा म्हणजे हडपसरचं साने गुरुजी रुग्णालय उभारण्यासाठी पुढाकार घेणारा जणु डॉ. अल्बर्ट श्र्वाईटझर, बाबा म्हणजे मंडल आयोगाच्या अंमल बजावणीसाठी हाक घालणारा लोहियावादी, बाबा म्हणजे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी तुरुंगवास भोगणारा सत्याग्रही, बाबा म्हणजे जयपुर हायकोर्टासमोरचा पुतळा हटवण्यासाठी लाॅंग मार्च काढणारा महाराष्ट्राचा बंडखोर, बाबा म्हणजे गोरगरीबांना परवडणारी, कष्टाची भाकरी देणारा अन्नपूर्णादाता, बाबा म्हणजे असंघटित मजुरांच्या पेन्शनसाठी दिल्लीला धडक देणारा जणू नारायण मेघाजी लोखंडे, बाबा म्हणजे सत्यशोधकांचा इतिहास महाराष्ट्रापुढे ठेवणारा महात्मा फुलेंचा शेवटचा सत्यशोधक, बाबांचं आयुष्य फुलेमय आहेच पण त्यांच्यात गांधी आंबेडकर यांचा समन्वयही आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा “जातीच्या निर्मुलनाचा लढा” कृतिशील करण्यासाठी महाराष्ट्रात “एक गाव एक पाणवठा”ही चळवळ सत्यशोधक बाबा आढाव यांनी यशस्वीपणे राबवली. असंघटित , वंचित ,माथाडी कामगार चळवळीचे झुंजार नेते व त्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढे डॉ .बाबा आढाव यांनी लढले आहेत. लातूरातील पन्नास वर्षांपूर्वी आडत बाजार या ठिकाणी असलेली सामाजिक विषमता व अमानुष असलेली वेठबिगारी व्यवस्था मोडीत काढण्याचे काम बाबांनी केले. २७ नोव्हेंबर १९७१ मध्ये त्यांनी महात्मा फुले समता प्रतिष्ठानची स्थापना करून २८ नोव्हेंबर १९७१पासून एक गाव एक पाणवठा ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवली.
महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाची विचारधारा महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी त्यांनी महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले त्यातील महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे सत्यशोधक साहित्याची पुस्तके निर्माण करणे त्यातूनच “दिनकरराव जवळकर समग्र वाड्.मय, केशवराव जेधे समग्र वाड्.मय, कृष्णराव भालेकर समग्र वाड्.मय ,आम्ही पाहिलेले महात्मा फुले, तृतीय रत्न नाटक, जागृतीकार भगवंतराव पाळेकर समग्र वाड्.मय इत्यादी अनेक महत्त्वाची ग्रंथसंपदा डॉ. बाबा आढाव यांनी निर्माण केली. सामाजिक बांधिलकीतून त्यांनी ” पुरोगामी सत्यशोधक ” हे नियतकालिक चालवले. या नियतकालिकातून अत्यंत अभ्यासपूर्ण लेखन करून महाराष्ट्रातील प्रागतिक विचार विश्व अत्यंत सशक्त केले.
फुले , शाहू, आंबेडकर ही विचारधारा महाराष्ट्रात सशक्त करणारे कृतिशील विचारवंत म्हणून डॉ.बाबा आढाव यांचे योगदान अत्यंत मोठे आहे









