अंबाजोगाईसाठी तीन महत्त्वाच्या प्रकल्पांना लवकरच हिरवा कंदील !
नंदकुमार मोरे ! बीड जिल्हा विशेष प्रतिनिधी: अंबाजोगाई रेल्वे विकासाला लवकरच ‘गति’ मिळणार आहे.आमदार नमिता मुंदडांच्या प्रयत्नांना यश येणार आहे. जनागृह अंबाजोगाई रेल्वे विकास समितीच्या वतीने करण्यात आलेल्या तीन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांच्या मागण्यांना लवकरच गती मिळण्याची चिन्हे आहेत. आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्यामार्फत या प्रकल्पांसाठी पाठपुरावा करण्यात आला असून, यामुळे अंबाजोगाईसह संपूर्ण मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.
प्रस्तावित तीन महत्त्वपूर्ण रेल्वे मार्ग:
घाटनांदूर – अंबाजोगाई – श्रीगोंदा (दौंड) मार्ग: मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणारा हा मार्ग व्यापार, शिक्षण आणि रोजगारासाठी महत्त्वाचा दुवा ठरेल. दौंड जंक्शनमार्फत महाराष्ट्र व दक्षिण भारताशी थेट कनेक्टिव्हिटी मिळेल.
सोलापूर – अंबाजोगाई – हिंगोली मार्ग: तुळजापूर, परळी वैद्यनाथ, औंढा नागनाथ यांसारखी महत्त्वाची तीर्थस्थळे जोडली जाऊन धार्मिक पर्यटन, औद्योगिक वाढ आणि प्रवासी वाहतुकीस मोठा लाभ होईल.
परळी – अंबाजोगाई –’ पंढरपूर मार्ग: पंढरपूर भक्तांसाठी सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होईल. तसेच, बार्शीमार्फत सोलापूर-बेळगाव पट्ट्याशी कनेक्टिव्हिटी वाढेल.
या प्रकल्पांमुळे अंबाजोगाई परिसरातील जनतेच्या प्रवासासाठी नवी सुविधा उपलब्ध होणार असून, तिन्ही मार्गांमुळे रेल्वे कनेक्टिव्हिटीचे जाळे अधिक सक्षम होणार आहे.









