Home latest News तळोजा नावडे येथील शिव मंदिरावरून मोठे गौप्यस्फोट

तळोजा नावडे येथील शिव मंदिरावरून मोठे गौप्यस्फोट

237

तळोजा नावडे येथील शिव मंदिरावरून मोठे गौप्यस्फोट

पत्रकार परिषदेत खुटारकर कुटुंबाने तळोजा पोलीस, पालिका आणि सिडकोवर केले गंभीर आरोप

कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी

तळोजा: नावडे येथील सिडको च्या संपादित जागेवरील एका अनधिकृत शिव मंदिरावरून मोठे वादळ उठले आहे. तेथील स्थानिक खुटारकर कुटुंबाने पत्रकार परिषदेत घेत अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी केवळ अनधिकृत बांधकामावरच नव्हे, तर मंदिराच्या नावाखाली अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा धक्कादायक दावा केला आहे.

सिडको, महापालिका, आणि पोलिसांवरच संरक्षणाचा थेट आरोप

खुटारकर यांनी आरोप केला आहे की, परप्रांतीय व्यक्तीने सिडकोच्या संपादित जागेवर हे अनधिकृत मंदिर उभे केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, सिडको, महापालिका आणि एमआयडीसी या सर्व संबंधित विभागांनी कारवाई करण्याऐवजी या अनधिकृत बांधकामाला संरक्षण देऊन तिथे होत असलेल्या गोरख धंद्यांना पाठबळ देत असल्याचे सांगितले.
खुटारकर यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही अधिकाऱ्यांनी बांधकामाकडे दुर्लक्ष केले आणि नंतर ‘मॅनेज’ होत. बांधकाम पूर्ण होऊ दिले. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी झटकून एकमेकांकडे बोट दाखविल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली.

दोषींवर कारवाई नाही, तक्रारदाराला त्रास

सर्वात गंभीर आरोप म्हणजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी खुटारकर यांना या जागेवर वारंवार न जाण्यासाठी धमकावले आणि ‘सतत गेल्यास तडीपार करू’ अशी धमकी दिल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे.

मंदिराच्या आडून गोरख धंद्यांना पाठबळ?

खुटारकर यांनी स्पष्ट केले आहे की, “आमचा मंदिराला विरोध नाही, तर मंदिराच्या आडून जे काही गैरप्रकार सुरू आहेत, त्याला आमचा विरोध आहे.” या गैरप्रकारांमध्ये चरस आणि गांजाची विक्री होत असल्याचा खुटारकर यांचा थेट आरोप आहे.

स्थानिकांवर तत्काळ कारवाई, पण परप्रांतीयांना अभय

पत्रकार परिषदेत खुटारकर यांनी प्रशासनाच्या दुटप्पी धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “स्थानिकांच्या घरावर कारवाई करण्यासाठी सिडको तात्काळ फौजफाटा घेऊन येते, पण परप्रांतीय व्यक्तीने अनधिकृत मंदिर उभे केले असताना, कारवाईसाठी सिडको कार्यालयात फेऱ्या मारून थकलो तरी कारवाई होत नाही. अशी अवस्था जर असेल तर स्थानिकांनी सिडकोला यापुढे जमिनी विकत देऊ नयेत”

महापालिका म्हणते: “आयुक्त निर्णय घेतील”

या प्रकरणावर महापालिका प्रभाग अधीक्षक अरविंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सिडकोने पत्र दिले आहे. धार्मिक स्थळांच्या अनधिकृत बांधकामाबाबत समिती स्थापन करण्यात आली आहे.त्याचे अध्यक्ष आयुक्त आहेत.आयुक्त निर्णय घेतील
याबाबत समितीची बैठक होईल, जे ठरेल त्याबाबत सिडकोला कळविण्यात येईल.सदर जागा सिडकोची असल्याने कारवाई सिडको करेल.

या संपूर्ण प्रकरणाची सिडको, महापालिका आणि पोलीस प्रशासन काय गंभीर दखल घेणार? की अनधिकृत बांधकामांना अभय देऊन त्या आडून चाललेल्या गोरख धंद्याची चौकशी करणार का? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.